| मुंबई | वृत्तसंस्था |
जागावाटपाची जी काही चर्चा होत होती ती महाविकास आघाडी म्हणून होत होती, ती प्रकाश आंबेडकर आणि माझ्यात होत नव्हती, त्यामुळे मी काही खोट बोलत नाही असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना दिले. प्रकाश आंबेडकरांना आम्ही शेवटी अकोल्यासह पाच जागांचा प्रस्ताव दिला होता, ते आमच्यासोबत यावेत असेच आमच मत होत असेही ते म्हणाले. संजय राऊत खोटं बोलतात, त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचा आरोप वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्या आरोपांवर संजय राऊतांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिले आहे.
ही महाविकास आघाडीची चर्चा आहे, शरद पवार होते, उद्धव ठाकरे होते, नाना पटोले होते. त्यामध्ये मी कुठेच नव्हतो. प्रकाश आंबेडकरांना अकोल्यासह चार जागांचा प्रस्ताव होता, त्यामध्ये आमची सीटिंग जागा असलेल्या रामटेकचा समावेश होता. काँग्रेसकडूनदेखील चांगला प्रस्ताव होता. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावं यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आग्रही होते. शेवटी त्यांना पाच जागांचा प्रस्ताव दिला.
प्रकाश आंबेडकर राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जे लोक देशाचे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत, त्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत होऊ नये असे आम्हाला वाटतंय. ना प्रकाश आंबेडकर खोटं बोलतात ना आम्ही खोटं बोलतोय, सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाची कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच ज्या जागांवर वाद आहेत त्या जागावर मैत्रिपूर्ण लढत व्हावी अशी काही नेत्यांची मागणी आहे, पण मैत्रिपूर्ण लढत ही भाजपच्या पथ्यावर पडेल असेही संजय राऊत म्हणाले.
प्रकाश आंबेडकर हे विद्वान नेते आहेत, ते आमच्यासोबत यावेत असे आम्हाला वाटतय अस राऊतांनी स्पष्ट केले आहे. 3 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची पत्रकारपरिषद होणार आहे. त्यावेळी सर्व मोठे नेते उपस्थित असणार असून सर्व प्रश्नाची उत्तर दिली जातील असेही ते म्हणाले.