संजोग वाघेरे बहुमतांनी निवडून येणार- विकास नाईक

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघिरे मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांकडूनदेखील त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. वाघेरे या निवडणूकीत बहूमतांनी निवडून येतील असा विश्‍वास शेकाप उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे. या निवडणुकीत संजोग वाघिरे यांच्या प्रचारार्थ शेकापचे नेते आ. जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. शेतकरी कामगार पक्षासह इंडिया आघाडी प्रचारात आघाडी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते गावोगावी जाऊन वेगवेगळ्या बैठकीच्या माध्यमातून वाघिरे यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. वाघिरे यांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष ठाम उभा राहिला आहे. इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते प्रचारात सामील होत आहेत. त्यामुळे प्रचाराच्यावेळी वाघिरेंना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावो, वाड्यांमध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. शेकाप नेते आ. जयंत पाटील यांच्या आवाहनानंतर उरण तालुक्यातील शेकाप कार्यकर्ते कामाला लागले आहेत. रात्रीचा दिवस करून प्रचार करीत आहेत.

संजोग वाघिरे यांचे जल्लोषात स्वागत केले जाते. मतदारांसह कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी स्वंयस्फुर्तीने पुढे येत आहेत. पुर्वी रामराज्याच्या काळात जनतेचे राज्य होते. जनतेच्या हितासाठी काम केले जात होते. परंतु देशात, राज्यात रामराज्याच्या नावाखाली मते मिळविण्याचा घाट महायुतीसह भाजपने घातला आहे. देशात, महागाई, बेकारी, गून्हेगारी वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या निवडणुकीत उभे राहिलेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे या निवडणूकीत वाघिरे बहूमतांनी निवडून येतील असा विश्‍वास आहे, असे शेकाप उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी व्यक्त केला.

Exit mobile version