जासई येथील प्रचारसभेत शिक्षक मतदारांचा निर्धार
| उरण | वार्ताहर |
कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रचारार्थ शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचे टीडीएफ पुरस्कृत उमेदवार आमदार बाळाराम पाटील यांची प्रसारसभा जासई येथे लोकनेते दि.बा. पाटील मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या उपस्थित शिक्षक मतदारांनी आ. बाळाराम पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना आ. बाळाराम पाटील म्हणाले, कोकण शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडीतूनच्या माध्यमातून निवडणूक लढविताना गेल्या सहा वर्षांपासून मी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आग्रही राहिलो. शिक्षकांचे विविध प्रश्न विधिमंडळाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. यामध्ये विनाअनुदानित, अनुदानित प्रचलित घोषित व अघोषित शिक्षकांना न्याय कसा मिळेल या दृष्टीने आंदोलने, मोर्चे, बैठका विधिमंडळात विविध आयुधं वापरून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये यश आले. शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न सोडविला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या दृष्टीनेदेखील प्रयत्न केलेला आहे. शिक्षण क्षेत्रातील कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रालाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापुढे शिक्षकांचे प्रश्नासाठी प्राधान्य देण्याचा तसेच शिक्षण क्षेत्रातील राज्यातील निधी कसा वाढेल याकडे लक्ष देणार आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करणार असून, आधुनिक व व्यवहारिक शिक्षण याकडे लक्ष देणार आहे. मला पहिल्या पसंतीचे मत देऊन भरघोस मतांनी निवडून आणा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
या प्रचार सभेसाठी शिवसेनेचे माजी आ. मनोहर भोईर, काँग्रेसचे महेंद्र घरत, कॉ. भूषण पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश राहलकर, काका पाटील आदी उपस्थित होते. सुरुवातीला प्रास्ताविक सुरेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे मनोज भगत, शेकाप चिटणीस विकास नाईक, माजी सभापती नरेश घरत, काँग्रेसचे मिलिंद पाडगावकर, विनोद म्हात्रे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शहर चिटणीस शेखर पाटील, रमाकांत म्हात्रे, रमाकांत पाटील, जीवन गावंड, वैशाली पाटील, माया पाटील, विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.