खालापूरात संतोष जंगम यांचा एकतर्फी विजय निश्‍चित

शेकाप चिटणीस अविनाश तावडेंचा विश्‍वास
। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते संतोष जंगम यांचा एकतर्फी विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास पक्षाचे खोपोली शहर चिटणीस तथा माजी नगरसेवक अविनाश तावडे यांनी व्यक्त केला आहे.
या निवडणुकीत सर्व प्रमुख पक्षांचा सहभाग असला तरीही प्रत्यक्ष लढत ही शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षात आहे. दरम्यान, शिवसेनेने खालापुरची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आ. महेंद्र थोरवे प्रचारात उतरले होते. तसेच खा. श्रीरंग बारणे यांच्यासह सेनेचे बडे नेते आणि शिवसैनिकांची मोठी फौज प्रचारात असल्याने निवडणुकीची रंगत वाढल्याचे चित्र होते. तर पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत 16 पैकी किमान 10 जागा जिंकण्याचा विश्‍वास शेतकरी कामगार पक्षाकडून केला जात आहे.
संपूर्ण आदिवासी मतदार असलेल्या या प्रभागात सर्वसाधारण जागेसाठी लढत होत असून, संतोष जंगम यांच्या विरोधात शिवसेनेने स्थानिक उमेदवार दिल्याने रंगत वाढली आहे. संतोष जंगम खालापूर नगरपंचायतीचे किंगमेकर असून त्यांच्या पराभवासाठी शिवसेनेने संपूर्ण ताकद लावली आहे.खालापूरमध्ये गेल्या 5 वर्षात संतोष जंगम यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड विकासकामे झाली असून आदिवासी बांधवांच्या सुख आणि दुखात सहभागी होत असलेल्या संतोष जंगम यांना विजयी करण्यासाठी आदिवासी बांधवांनी कंबर कसली असल्याने सर्वाधिक मताधिक्याने संतोष जंगम विजयी होतील, असा विश्‍वास शेतकरी कामगार पक्षाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version