| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील फोफेरी येथील युवा जलतरणपटू सारा अभिजीत वर्तक हिची बँकॉक येथे होणाऱ्या AOSI स्विमिंग चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र ॲक्वाटिक इंडिया संघात तिची निवड झाल्याबद्दल शेकाप प्रवक्त्या चित्रलेखाताई पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन साराचा गौरव करण्यात आला. यावेळी साराचे वडील अभिजित वर्तक, शेकाप नेते अनिल पाटील, दिलीप गावंड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सारा अभिजीत वर्तक ही भारतातील ओपन-वॉटर (खुले जलस्रोत) जलतरण क्षेत्रातील अत्यंत आश्वासक खेळाडू म्हणून उदयास येत आहे. आपल्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर तिने जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आगामी स्पर्धेसाठी साराला शुभेच्छा दिल्या.






