कंपनीविरोधात सारंग ग्रामस्थ आक्रमक

न्याय न दिल्यास उपोषणाचा इशारा

। खोपोली । प्रतिनिधी ।

खालापूर तालुक्यातील सारंग गावाच्या हद्दीत नव्याने उभारण्यात येणार्‍या मे.क्लेरीझेस एस.इ.झेड. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मालकाने शेतकर्‍यांची जमीन कवडीमोल भावाने खरेदी केली आहे. कंपनीचे बांधकाम करताना स्थानिकांना रोगजार आणि कामधंदा देण्याचे कबूल केले होते. मात्र कंपनी व्यवस्थापनाने स्थानिकांना काम न देता दडपशाही पद्धतीने काम करण्यास सुरु केल्याने स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत खालापूर तहसीलदार व खालापूर पोलीस ठाण्यात बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून निवेदन देत दिले आहे.स्थानिकांना रोजगार दिला नाही, तर सोमवारी (दि.24) देविदास सोगे व नारायण जमदाडे हे उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनातून प्रशासनाला दिला आहे.

खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोली यांची सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्या.अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष देविदास सोगे, सचिव राजेंद्र जमदाडे, सल्लागार ज्ञानेश्‍वर सोगे, खजिनदार संदिप पाटील, महेश सोगे, जगदीश दिसले जयदास मुसळे, मंगेश सोगे, अजय सोगे, मीतेश दिसले, संध्या दिसले, सुमन दिसले, विठाबाई दिसले, जनार्दन दिसले, अलका पांडव, दिपाली पवार, अ‍ॅड.मानसी सोगे, विद्या पवार, वृंदा पवार, सोनल पवार, सुधीर दिसले, प्रसाद दिसले आदि प्रमुखांनी भेट घेतली. यावेळी सारंग गावातील शेतकरी यांची जागा मे.क्लेरीझेस एस.इ.झेड.प्रा.लि. या कंपनीने वेगवेगळ्या माध्यमातून कवडी मोलाने जमीन 1995 – 96 साली हस्तांतरित केली होती. त्या जमिनी घेत असताना शेतकरी वर्गाला तोंडी आश्‍वासने देण्यात आली होती. या जमिनीवर सिमेंट पोल बसविण्यापासून ते कंपनी पूर्णपणे उभी रपर्यंत जी काही कामे असतील, ती सर्व कामे शेतकरी व ग्रामस्थांनाच देण्यात येतील, त्यात लागणारे साधनसामग्री पासून ते मटेरियल सप्लायसह शेतकरी व ग्रामस्थांना कामे देण्यात येतील, अशी आश्‍वासने कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आली. तर तुमच्या कुटुंबाला कायमची रोजीरोटी राहून सगळ्यांना कामधंदा मिळेल असे सांगण्यात आले होते, परंतु सदर कंपनीने जागा हस्तांतरित केल्यानंतर शेतकर्‍यांना जमिनी लागवडीपासून वंचित केले. यामुळे ग्रामस्थानी सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोळी यांची भेट आपल्या समस्या मांडून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

कंपनीने मागील चार ते सहा महिन्यापूर्वी सारंग गावातील जमिनीवर काम चालू केले असून, ती कामे बाहेरील व्यक्तीस देण्यात आली. बाहेरील ठेकेदाराने काम चालू केल्याचे ग्रामस्थ व शेतकरी यांना समजताच चालू असलेले कामासंदर्भात त्या ठेकेदाराकडे विचारपूस करण्यास गेलेल्या ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाला सदर ठेकेदाराने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली व गुंडांना गावातील ग्रामस्थांना व शेतकर्‍यांना मारण्याकरीता बोलावले. या बाबतचा सबळ पुरावा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामस्थांवर अन्याय होत असल्याने न्याय मिळावा म्हणून खालापूर तहसिलदार व खालापूर पोलीस यांना निवेदन दिले आहे. यातून तोडगा नाही मिळाला तर 24 जूनपासून उपोषण करणार आहोत.

राजेंद्र जमदाडे,
सचिव,
सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था
Exit mobile version