सुधागडात कडधान्ये पिकाला साडीच्या कुंपणाचे संरक्षण

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली सुधागड सह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कडधान्याची शेती केली जाते. या कडधान्य पिकाचे शेळी व गुरांपासून संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेताला साड्यांचे कुंपण करत आहेत. ही अतिशय वेगळी बाब समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्ग, पाली खोपोली महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात असे कुंपण लावलेली शेत दृष्टीक्षेपास पडतात. सुधागड व इतरही तालुक्यातील शेतकरी अशा प्रकारचे कुंपण आपल्या शेतांना लावत आहेत. पक्क्या भिंतीचे किंवा लोखंडी जाळी व तारांचे कुंपण करणे परवडत नसल्याने सर्वसाधारणपणे शेतकरी आपल्या शेताला करवंदाची जाळी, काटेरी पेरकूट, किंवा काट्याकुट्यांचे कुंपण करतात. मात्र रानमोडीने जिल्ह्यातील करवंदाच्या जाळीचे नुकसान केले आहे. पेरकूट व काट्याकुट्या देखील कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे शेताच्या कुंपणासाठी घरातील जुन्या साड्या वापरल्या जातात असे एका शेतकर्‍याने सांगितले. हे कुंपण तयार करण्यास सोप्पे व कमी खर्चिक व कमी श्रमाचे असल्याने अनेकजण अशा कुंपणाला पसंती देतात. यामुळे कडधान्य पिकाचे गुरे व शेळ्यांपासून संरक्षण होते. तर शेतकरी मनीष पाटील म्हणाले की गरीब व आदिवासी शेतकर्‍यांसाठी हे कुंपण वरदान ठरत आहे.

Exit mobile version