तक्रार करुनही नपाचे दुर्लक्ष
नागरिकांकडून संताप व्यक्त
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
लहानग्यांनी गजबजलेल्या पालीतील एकमेव बालोद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सद्यस्थितीत हे बालोद्यान घटका मोजत असल्याने अनेक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. या बाबत अनेक वेळा नगरपंचायतीकडे तक्रार करुन देखील असुन अद्याप ही परिस्थिती जैसे थे आहे. नगरपंचायत दुर्लक्ष करत असल्याने पेण-सुधागड-रोहा मतदारसंघाचे आ. रवींद्र पाटील यांनी तरी आपल्या आमदार फंडातून बालोद्यानासाठी निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
बालोद्यानाची संघर्ष ग्रुप आणि तत्कालीन पाली ग्रामपंचायती मार्फत लहान मुलांची गरज ओळखून येथील राम आळीमध्ये हे बालोद्यान बनविण्यात आले होते. त्यानंतर पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नगरपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक झाली. दरम्यानच्या काळात उद्यानाकडे दुर्लक्ष झाले. नगरपंचायत निवडणूक होऊन नगरपंचायत प्रस्थापित झाली. यावेळी या बलोद्यानाला नवी येईल अशी अपेक्षा होती मात्र हे बालोद्यान तसेच आहे.
येथील पाळणे, सी-सॉ, गेट व बाकडे तूटले आहेत. तारेचे कुंपण अनेक ठिकाणी मोडले आहे. त्यामुळे येथे गुरांचे सर्रास वास्तव असते. येथील झाडे व गवत कोमेजून गेले आहे. फरशांची दुरवस्था झाली आहे. आजूबाजूला वाहने पार्क केलेली असतात. परिणामी लहानग्यांना खेळण्यासाठी हक्काचे नसल्याने त्यांचा प्रचंड हिरमोड होत आहे.
संघर्ष ग्रुप आणि तत्कालीन ग्रामपंचायतीने मिळून केलेल्या उद्यानाकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष आहे.वारंवार तक्रारी करून ही बालोद्यानाची परिस्थिती जैसे थे आहे.लहानग्यांना खेळण्यासाठी हक्काची जागा नाही. उद्यानाची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करून नवी झळाळी द्यावी. – अमित निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य