| मुंबई | प्रतिनिधी |
सर्फराज खानची (220 चेंडूंत 162 धावा) शतकी खेळी आणि तनुष कोटियनच्या (114 चेंडूंत 71 धावा) अर्धशतकाच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आपल्या पहिल्या डावात 481 धावसंख्येपर्यंत मजल मारली. यानंतर आपल्या दुसर्या डावात फलंदाजीस आलेल्या तमिळनाडूने 1 बाद 62 धावा केल्या. ते अजूनही मुंबईच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या 275 धावांनी पिछाडीवर आहेत.
सामन्याच्या दुसर्या दिवशी मुंबईने 6 बाद 186 धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. यानंतर सामन्याची सर्व सूत्रे सर्फराज खानने आपल्या हातात घेत तमिळनाडूच्या गोलंदाजांना स्थिरावू दिले नाही. त्याला कोटियनची चांगली साथ मिळाली. या दोघांनीही सातव्या गडयासाठी 167 धावांची निर्णायक भागीदारी रचली. कोटियन बाद झाल्यानंतरही सर्फराजने मोहित अवस्थीच्या (69) साथीने मुंबईच्या धावसंख्येत भर घालणे सुरूच ठेवले. दोघांनी नवव्या गडयासाठी 60 धावांची भागीदारी रचली.
दरम्यान, सर्फराजने आपले शतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार व एक षटकार लगावला. सर्फराज माघारी परतल्यानंतरही अवस्थीने सिद्धार्थ राऊतच्या (नाबाद 31) साथीने संघाला मजबूत स्थितीत नेले. त्यांनी अखेरच्या गडयासाठी 92 धावा जोडल्या. यामुळे मुंबईने पहिल्या डावात 337 धावांची भक्कम आघाडी घेतली.







