तरुणांनी जोपासला सारिपाटाचा खेळ

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
गणेश उत्सवामध्ये जागरण म्हणून परिचित असणारे सर्व खेळ हळूहळू लोप पावत असतांना गोवे येथील तरुणांनी आधुनिक काळात ही सारिपाटाचा खेळ जोपासला आहे. कौरव, पांडवापासून चालत आलेला सारिपाटाचा खेळ हा गणेश उत्सवापासून दसर्‍यापर्यंत जागरण म्हणून बुद्धीचा वापर करुन खेळण्यात येणारा खेळ आहे. हा पुर्ण होण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात.

पिढ्यान-पिढ्या पासून चालत असणारा सारिपाटाचा खेळ हा मोठ्या बुद्धीचा वापर करुन खेळला जातो. परंतु भावी तरुण पिढी या जुन्या खेळा पासून दूर होत असताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत गोवे गावातील या खेळात पारंगत असलेले ज्येष्ठ नागरिक रामा होनाजी गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हा खेळ जोपसला जात आहे.

रामा गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण वर्गातील लीलाधर दहिंबेकर, प्रशांत गुजर, चंद्रकांत पवार, निलेश दहिंबेकर, जयसिंग पवार, अजित दहिंबेकर, कल्पेश सुर्वे, आकाश दहिंबेकर, साहिल दहिंबेकर, सार्थक दहिंबेकर, हरिचंद्र गुजर, अरुण दहिंबेकर हे तरुण सारिपाटाचा खेळ आपल्या बुद्धीचा वापर करुन जोपासत आहेत.

Exit mobile version