| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील कातळपाडा-झिराड येथील नितीन नार्वेकर यांच्या घराजवळच्या शेतात मंगळवार, दि. 24 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास शेतमजुराला चारा कापत असताना भला मोठा सर्प दिसला, याने याबाबत शेतमालक नितीन नार्वेकर यांना सांगितले. यावर नार्वेकर यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता ते अजगर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वेळ न दवडता ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्पमित्रांना दिली. यावेळी सर्पमित्र रुपेश गुरव, तुषार चव्हाण, शिवम सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन तब्बल सात फूट लांब असलेल्या अजगराला सुरक्षितपणे पकडून कनकेश्वर डोंगरावर नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. याबद्दल सर्पमित्रांचे कौतुक केले जात आहे.
यावेळी सर्पमित्रांनी बोलताना सांगितले की, मागील काही काळापासून जंगली प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढताना दिसत आहे. जंगल भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्यामुळे व वणवे लावल्यामुळे प्राण्यांचे जंगलातील नैसर्गिक खाद्य नष्ट झाल्याने हे जंगली प्राणी आपल्या खाद्याच्या शोधात मानवी वस्तीकडे फिरकताना दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने सरपटणारे प्राणी, माकडे, बिबट्या, वाघ, तरस, रानडुकरे आदी इतर प्राण्यांचा समावेश आहे. यामध्ये सध्या जास्त प्रमाणात सरपटणारे प्राणी मानवी वस्तीकडे यायला लागले आहेत, याला जंगलात लावलेले वणवे प्रमुख कारण आहे. जंगलातील वणव्यात सरपटणार्या प्राण्यांचे किडे, किटके, मुंग्या हे प्रमुख खाद्य असल्याने तेच जर नष्ट झाले तर हे प्राणी आपसूकच खाद्याच्या शोधात भटकत खाली येतात. हे प्राणी मानवाला कोणताच त्रास देत नाहीत, पण त्यांना डिवचले अथवा डीवचण्यासारखे कृत्य केले तर ते आपल्याला त्रास नक्कीच देऊ शकतात, हे प्राणी जंगलातून वस्तीकडे येऊ नये यासाठी आपल्या परिसरातील जंगल भागाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे, अन्यथा हे हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीकडे येऊन आपल्या जीवाला धोका पोहोचवू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबत सर्पमित्रांनी चिंता व्यक्त केली आहे. यापुढे झिराड पंचक्रोशीत जर सर्प व इतर सरपटणारा प्राणी घरात अथवा आपल्या परिसरात दिसल्यास त्याला न मारता आम्हाला पुढील नंबरवर रुपेश गुरव – 8007879759 संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.