बदल्यांच्या फायली दाबल्या; कारवाईच्या बडग्याने डॉ. बाई आल्या वठणीवर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी मनिषा विखे कायमच वादाच्या भोवर्यात सापडत असतात. कर्मचार्यांच्या बदलीची फाईल थांबविण्याचा प्रताप त्यांनी केला होता. याबाबतची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना मिळाली. त्यांनी मंगळवारी तडक विखे यांच्या केबिनमध्ये प्रवेश करुन सर्व फाईलींची झाडाझडती घेतली. त्यामध्ये तक्रारदाराने केलेली तक्रार खरी ठरली. डॉ. बास्टेवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी विखेंवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला. विखे यांनी गयावया केल्यानंतर डॉ. बास्टेवाड यांनी वॉर्निंग देत प्रकरणावर पडदा टाकला. मात्र, पुढे असे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये सुरु आहे.
जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी असताना ती जबाबदारी हिवताप विभागाकडे सोपवून आपल्याकडील जबाबदारी झटकण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात आले. तसेच कर्मचार्यांना वेठीस धरण्याचा प्रकार त्यांच्याकडून होत असल्याची चर्चा आरोग्य विभागात जोरात सुरु आहे. आरोग्य विभागातील काही कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. बदल्यांची फाईल रोखण्याचे काम त्यांच्याकडून झाल्याचा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी बास्टेवाड यांच्या लक्षात आला. त्यांनी ती फाईल मंगळवारी मागविली. त्यावेळी त्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा जोरात सुरु आहे. आरोग्य अधिकार्यांच्या या प्रकाराबाबत त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यासाठी बास्टेवाड यांनी सुरूवातही केली होती. परंतु, त्यांना सुधारण्याची संधी देत कारवाई तूर्तास थांबविल्याचे समोर आले आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी बास्टेवाड व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.