2900 शाळांपैकी अवघ्या 306 शाळांमध्ये कॅमेरे
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
बदलापूर येथील घटनेने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेा प्रश्न निर्माण झाला. यामुळे शाळा परिसर, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ज्या शाळांमध्ये सीसीटी कॅमेरे नाहीत, अशा शाळांमध्ये एक महिन्याच्या कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, एक महिन्याचा कालावधी संपत आला असताना रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. जिल्ह्यातील दोन हजार 900 शाळांपैकी फक्त 306 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शासकीय शाळांमध्ये निधी नसल्याने कॅमेरे बसविण्यास आले असल्याची माहिती समोर येत आहे.
बदलापूर येथील दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सरकारने शासन निर्णय जारी करीत एक महिन्याच्या आत शाळेच्या प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे बंधनकारक केले. सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी एक महिन्याच्या आत शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अन्यथा शाळेची मान्यता व अनुदान रोखले जाईल, अशी सक्त ताकीद दिली. जिल्हा परिषदेच्या शाळेत कॅमेरे बसविण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची राहिली. मुख्याध्यापकांनी आठवड्यातून तीन दिवस सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासावे. आक्षेपार्ह आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, अशा सूचना शासनाने दिल्या होत्या.
रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपरिषद, नगर पंचायतीच्या दोन हजार 622, खासगी 74 व विना अनुदानित 204 अशा एकूण दोन हजार 900 शाळा आहेत. या शाळांपैकी 306 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यात जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिकेतील 75, खासगी 51 व विना अनुदानित 180 शाळांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी नसल्याने शिक्षण विभागाने मागील पंधरा दिवसांपूर्वी निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे मागणी केली. मात्र, अद्याप त्याची पूर्तता झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. सरकारनेच महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना करूनदेखील सरकारकडूनच कॅमरे बसविण्यासाठी वेळेवर निधी न देणे, ही मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जाहिरातबाजी करायची आणि दुसर्या बाजूला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निधी वेळेवर न देणे, ही मोठी चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा नियोजन समितीने याकडे गांभीर्याने लक्ष देेणे आवश्यक असताना ही कामे संथगतीने का होत आहेत, असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यातील शाळांवर दृष्टिक्षेप
एकूण शाळा 2,900
जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपरिषद, नगर पंचायतीच्या 2,622
खासगी 74
विना अनुदानित 204
सीसीटीव्हीच्या नजरेत
एकूण शाळा 306
जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिकेतील 75
खासगी 51
विना अनुदानित 180