। पनवेल । प्रतिनिधी ।
सापाचे अन्न साखळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. साप हा केवळ मानवमित्र नसून तो निसर्गमित्रही आहे. सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. याशिवाय पिकांवरील कीटक, डासांच्या अळ्या, घुशी यांवर साप नियंत्रण ठेवतो. एक धामण वर्षात शेकडो उंदीर-घुशी खाते. सापाचे उंदीर पकडण्याचे तंत्र परिणामकारक आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर या निसर्गमित्राला जपण्याबरोबरच सर्पाविषयी जनजागृती करण्यासाठी नावडे येथील परशुराम म्हात्रे विद्यालय आणि आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनिअर कॉलेजच्या संकुलामध्ये रायगड भूषण राजू मुंबईकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. गोडगे, पर्यवेक्षक श्री. मोहिते उपस्थित होते. नागपंचमीच्या पर्वावर चिमुकल्या विद्यार्थ्यांना सर्पमित्रांकडून सापांची माहिती आणि घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन गरजेचे असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्पविषयाची माहिती जाणून घेतली. यावेळी सर्पमित्र रायगड भूषण राजू मुंबईकर व त्यांचे सहकारी यांनी सर्व सापांच्या जाती तसेच विषारी साप कोणते बिनविषारी साप कोणते याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांमध्ये सापांची माहिती देऊन जनजागृतीपर संदेश देण्याची संधी दिल्याबद्दल राजू मुंबईकर यांनी मुख्याध्यापकांचे आभार मानले.