आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कळकळीची विनंती
| मुंबई | वृत्तसंस्था |
कोरोनाच्या ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता थंड पडलेल्या लसीकरणाला पुन्हा वेग आला आहे. याच लसीकरणाकामी गावागावातील सरपंच विशेष भूमिका बजावू शकतात. लसीकरणासाठी गावागावातील सरपंचांनी मदत करावी. त्यांच्या मदतीशिवाय हे काम अशक्य आहे, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी 55 सरपंचांना लसीकरण करण्यात मदत करत नसल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. लसीकरणासाठी राज्यातील सरपंचांनी मदत करावी. त्यांच्या मदतीशिवाय लसीकरणाला वेग येणं शक्य नाही. ते जबाबदार लोकप्रतिनिधी गावस्तरावर असतात. त्यामुळे राष्ट्रीय कामात ते मदत करत नसतील तर ते चुकीचं आहे. त्यामुळे त्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन टोपे यांनी सरपंचांना केले आहे. केंद्रीय औषध मानक तज्ज्ञ संस्थेची बैठक होणार आहे. या बैठकीतून आपल्याला लहान मुलांचं लसीकरण आणि बूस्टर डोससंदर्भात निर्णय होणं अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते. फ्रंट लाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्यासाठी या संस्थेने भूमिका घ्यावी, अशी मागणीही टोपे यांनी केली. या संस्थेच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास तो स्वागतार्हच राहील, असंही टोपे म्हणाले. राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नसल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
- लसीकरण जरी ऐच्छिक असलं, तरी ते गरजेचं आहे. आज जरी हा निर्णय कायद्यात बसत नसला तरी ते गरजेचं आहे. नागरिकांनी लसीकरण तातडीनं करून घ्यावे. कोरोना नियमांचं पालन करावे. – राजेश टोपे, आरोग्यमंत्री