तक्रारदारांचा संताप वाढला
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
विचुंबे ग्रामपंचायत सरपंच निलंबनासंदर्भातील प्रकरणात पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार तारखा देऊन ही ठोस निर्णय होत नसल्यामुळे संबंधित प्रकरण रखडल्याची भावना व्यक्त होत आहे.
गुरचरण जमिनीवरील कथित बेकायदा बांधकामप्रकरणी संबंधित सरपंचाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात तहसील कार्यालयाकडून केलेल्या सर्वेक्षणादरम्यान नायब तहसीलदारावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर प्रकरण अधिक गंभीर झाले होते. मात्र, एवढ्या गंभीर बाबी असूनही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 23 एप्रिल रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्या दिवशीही निर्णय न घेता पुढील तारीख देण्यात आली. यामुळे संबंधितांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणात आतापर्यंत अनेक वेळा सुनावणी ठेवण्यात आली असून, प्रत्येक वेळी निर्णय लांबणीवर पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रशासनाकडून नेमकी कारवाई कधी होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, या प्रकरणातील तक्रारदार तथा माजी सभापती प्रणाली भोईर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन वर्षांपासून आम्ही न्यायाची वाट पाहात आहोत. वारंवार सुनावणी ठेवूनही प्रशासन निर्णय घेत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अधिकाऱ्यावर हल्ला होऊनही कारवाई होत नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुठे मागायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, लवकरात लवकर अंतिम निर्णय न झाल्यास पुढील कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
