छबिना उत्सवात सहलीचे आयोजन
| पोलादपूर | प्रतिनिधी |
साहित्य, राजकारण अथवा समाजसेवेतून प्रसिद्धी मिळविण्यासाठी सतत प्रसत्नशील असलेल्या कथित समाजधुरिणांना महाड येथील सेवाभावी ‘संवेदना’ ग्रुपने प्रसिद्धीलोलुपता टाळून कर्तव्य आदर्शवत मानण्याची प्रेरणा निर्माण केली आहे. महाड येथील विरेश्वर महाराजांच्या छबिन्यात सातव्यांदा अंध विद्यार्थ्यांसाठी आनंद निर्माण करण्यासाठी सहल आयोजित केली होती.
मंडणगड तालुक्यातील घराडी या गावात स्नेहज्योती अंधविद्यालय हे निवासी अंधविद्यालय आहे. यात गरीब वर्गातील अंध विद्यार्थ्यांना शालेय तसेच इतर व्यवसायविषयक शिक्षण देण्यात येते. शाळेच्या अध्यक्षा आशाताई कामत (82) आणि मुख्याध्यापिका प्रतिभाताई सेनगुप्ता (76) या दोन भगिनी आणि लोकांकडून मिळणाऱ्या देणग्या यावर या शाळेचा डोलारा गेली वीस वर्षे उभा आहे. या शाळेतील अंधविद्यार्थ्यांना महाडमधील संवेदना ग्रुपच्या माध्यमातून या शाळेतील अंध विद्यार्थ्यांना महाडच्या छबिन्यात आणण्याचे सात वर्षांपूर्वी ठरले आणि तेव्हापासून आजपर्यंत हा उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे. महाडमधील काही संवेदनशील नागरिक एकत्र येऊन या विद्यार्थ्यांचे हंगामी पालकत्व स्वीकारतात आणि त्यांना जत्रेत फिरवून त्यांच्या आनंदाचे साक्षीदार होतात.
याच अनुषंगाने 10 मार्च रोजी परत एकदा स्नेहज्योती अंधविद्यालय, घराडी येथील विद्यार्थ्यांनी महाडमधील श्रीविरेश्वर महाराजांच्या छबिन्याचा आनंद लुटला. दरवर्षीप्रमाणे, संवेदनशील महाडकरांनी संवेदना ग्रुपच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांबरोबर हंगामी पालक म्हणून उपस्थित राहून त्यांच्या आनंदात स्वत:चा आनंद मिळवला. 15 अंध विद्यार्थी व 2 अंध शिक्षकांसह एकूण 23 जण स्नेहज्योती शाळेकडून महाडला छबिन्याच्या जत्रेमध्ये फिरण्यासाठी आले. संवेदना ग्रुपतर्फे त्यांची जाण्या-येण्याची, अल्पोपहाराची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. प्रथम अल्पोपहार झाल्यावर महाडचे ग्रामदैवत श्रीविरेश्वर महाराज यांचे दर्शन घेण्यात आले. यानंतर हंगामी पालकांनी विद्यार्थ्यांना जत्रेत फिरवून त्यांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन आकाश पाळणा, होडी आणि मिनी ट्रेन अशा विविध मनोरंजनात्मक खेळांचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.अंधविद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या टीशर्टसमुळे त्यांचे वेगळेपण छबिन्यातील भाविकांना जाणवत होते. मात्र, अधिकाधिक आठवणी साठविण्यासाठी छबिन्याच्या रंगात रंगवून घेण्यासाठी आलेल्या या स्नेहज्योतीच्या अंधविद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असल्याचे दिसून येत होते. सरतेशेवटी भोजन करून विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या रम्य आठवणी आणि पुढच्या वर्षीची स्वप्नं अंत:चक्षूंनी मनात साठवत महाडकरांच्या ‘संवेदना’ अनुभवत निरोप घेतला.
