नगरपरिषदेकडून घरोघरी औषधाचे वाटप
| माथेरान | वार्ताहर |
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. तेव्हा या दिवसात पाण्यातून होणार्या आजारांना लांब ठेवण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेतर्फे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे याकरिता ‘सारू क्लोर’ या पाणी शुद्ध करण्याचे औषध याचे वाटप करण्यात आले आहे.
माथेरान येथे सर्वत्र लाल मातीचे रस्ते आणि त्याचबरोबर भरपूर प्रमाणात डोंगराळ भाग आहे. अशातच पावसाळा सुरू झाला की माथेरानसारख्या डोंगराळ भागात पिण्याच्या पाण्याच्या समस्या भेडसावत असतात. मागील काही दिवसांपूर्वी अशुद्ध व गढूळ पाणी पुरवठा माथेरान जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आला होता. अशा दूषित पाण्याचा त्रास नागरिकांना आणि येथे येणार्या पर्यटकांना होऊ नये, त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ नये आणि अशुद्ध पाण्यामुळे इथे कोणतीही रोगराई उदयास येऊ नये यासाठी जलशुद्धीकरण ‘सारू क्लोर’ या औषधाचे वाटप प्रत्येक वर्षी नगरपरिषदेकडून करण्यात येते. यावर्षीही या क्लोरचे वाटप नगरपरिषद कर्मचार्यांमार्फत नागरी वस्तीत घरोघरी जाऊन करण्यात आले आहे.







