पोडियमवर स्थान मिळवणारा पहिला भारतीय
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय उंच उडीपटू सर्वेश कुशारेने मोनाको डायमंड लीगमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. आपल्या डायमंड लीग पदार्पणातच, त्याने उंच उडी स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले आणि पोडियमवर स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय उंच उडीपटू ठरला. 31 वर्षीय कुशारेसाठी तिसरं स्थान मिळवणे सोपं नव्हते, पण त्यानं 2.26 मीटरच्या उडीसह तिसरे स्थान मिळवण्यात यश मिळवले. यासह, कुशारे एका विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे.
सर्वेश हा डायमंड लीगच्या इतिहासात अव्वल-3 मध्ये स्थान मिळवणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. सर्वेशच्या आधी, नीरज चोप्रानं 2022 पासून 13 वेळा, लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने 2023 मध्ये एकदा आणि माजी थाळीफेकपटू विकास गौडाने डायमंड लीगच्या इतिहासात दोनदा अव्वल-3 मध्ये स्थान मिळवले आहे. सर्वेशचा सध्याचा फॉर्म प्रभावी ठरला आहे. डायमंड लीग पदार्पणाच्या काही काळापूर्वीच, भुवनेश्वर इथे झालेल्या राष्ट्रीय आंतर-राज्य चॅम्पियनशिपमध्ये त्याने तेजस्विन शंकरचा आठ वर्षे जुना 2.29 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडत 2.31 मीटरचा नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. या स्पर्धेत कुशारे तिसऱ्या स्थानी राहिला. त्याच्या पुढं कतारचा तीन वेळचा विश्वविजेता आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता मुताझ एसा बार्शिम आणि अमेरिकेचा 2023 विश्व चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता जुवॉन हॅरिसन यांसारखे स्टार खेळाडू होते.
मोनॅको डायमंड लीगमध्ये, सर्वेश कुशारेने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 2.12 मीटरचा टप्पा पार केला. त्यानंतरच्या तीन प्रयत्नांमध्ये त्याने अनुक्रमे 2.16 मीटर, 2.20 मीटर आणि 2.23 मीटरचे प्रयत्न केले. सर्वेशने आपल्या पाचव्या प्रयत्नात 2.26 मीटरचा टप्पा पार केला, परंतु सहाव्या प्रयत्नात तो 2.28 मीटरचा टप्पा पार करु शकला नाही. युक्रेनचा जागतिक इनडोअर चॅम्पियन ओलेह डोरोशचुकनं 2.32 मीटर उडी मारुन ही स्पर्धा जिंकली, तर ब्रिटनचा जॅक किमानी 2.30 मीटर उडीसह दुसऱ्या स्थानी राहिला. आता 23 जुलैपासून सुरु होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सर्वेश कुशारेच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
