सासवणे ग्रामपंचायतीने केले कोरोनाला हद्दपार


सरपंच संतोष गावंड यांच्यासह सर्व सदस्यांची कौतुकास्पद कामगिरी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील सासवणे ग्रामपंचायतीमधील सासवणे कोळीवाडा एप्रिल ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. त्यामुळे सासवणे ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले होते. सरपंच आणि सर्व सदस्यांनी प्रशासनाच्या मदतीने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करीत हाताबाहेर गेलेली परिस्थिती सुधारुन कोरोनाला हद्दपार केले. या सर्वांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सासवणे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र, सासवणे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष गावंड, उपसरपंच सुषमा नाखवा, ग्रामसवेक नितेश तेलगे आणि सर्व सदस्य यांनी प्रशासनाच्या मदतीने या संकटाचा धीराने सामना करीत शिबिराचे आयोजन करीत कोरोना टेस्टिंग वाढवून औषधोपचार सुरु केले. त्यामुळे हाताबाहेर गेलेली परिस्थिती सुधारुन कोरोनाला हद्दपार करणे शक्य झाले. या संकटाचा सामना करण्यासाठी मदत केल्याबद्दल शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह सर्व प्रशासकीय व आरोग्य विभागाला सरपंच संतोष गावंड यांनी धन्यवाद दिले आहेत.

सासवणे कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनानेदेखील याची गंभीर दखल घेत हा परिसर कन्टेमेन्ट झोन म्हणून घोषित केला. सासवणे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात होता. गावात आरोग्य विभागाचा कॅम्प लावण्यात आला. तातडीने रुग्णांना रुग्णलयात हलविण्यासाठी रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आली होती. गावातील कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची प्राधान्याने अँटीजेन चाचणी केली जात होती. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांच्यावर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले. चार-पाच दिवसांत सुमारे 400 जणांची टेस्ट करण्यात आली. यात संसर्गित व्यक्तींवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. त्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून आला. अवघ्या काही दिवसातच सासवण्यातील कोरोनाला हद्दपार करुन लढाई जिंकण्यात ग्रामपंचायतीला यश आले.

सरपंच संतोष गावंड यांनी या संकटकाळात बाहेर पडण्यासाठी शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, तहसीलदार सचिन शेजाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत घासे, डॉ. सुप्रिया वेटकोळी, मंगेश जुईकर, डॉ. मयुरी जाधव, प्रीती घासे, आरोग्य सेवक श्रीधर पेडणेकर, आशा सेविका रोशना घरत, सोनाली ठाकूर, अमिता वर्तक यांच्यासह डॉ. शाम ढवण, मांडवा पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके, तलाठी तुषार काकडे, राजेश नाखवा, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, पोलीस पाटील प्रियांका गावंड, प्रशांत पाटील या सार्‍यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.

Exit mobile version