42 बोगस शिक्षकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा

| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील 42 शिक्षकांची माहिती प्राथमिक शिक्षक भरतीसाठी बनावट मान्यता आणि गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी रायगड जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांनी दिली. मात्र, माध्यमिक शिक्षकांबाबत अशी कोणतीही चौकशी न लागल्याने त्यांच्याबाबत कसलीही माहिती पाठविण्यात आली नसल्याचे साळुंखे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले.

शिक्षक भरतीसाठी बनावट मान्यता व अन्य गैरव्यवहार प्रकरणात रायगड जिल्हातील काही शिक्षक असल्याने पुणे पोलीसांकडुन रायगड जिल्हातील 450 शिक्षकांची माहीती रायगड शिक्षणाधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी मागितली आहे. राज्यात 2019 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली असता 3 लाख 43 हजार 284 परीक्षार्थी होते. त्यापैकी16 हजार 705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी 7 हजार 880 जण लाच देऊन परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समोर आले होते. हे प्रकरण पुणे पोलिसांकडून उघड झाल्यानंतर 2019 आधीच्या शिक्षक भरतीवर पुणे पोलिसांकडून संशय व्यक्त करण्यात आल्याने 2014 पासून संशय असलेल्या शिक्षकांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणामध्ये रायगड जिल्हयातील काही शिक्षक लाच देऊन पास झाले असल्याचे उघड झाले आहे. याकारणास्तव याप्रकरणी रायगड शिक्षणाधिकारी यांनी रायगड जिल्हयातील सर्व शिक्षकांची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र व 23 फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत रुजू झालेले प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांची माहिती सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मागितली. यामध्ये माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रता अथवा मान्यताप्राप्त विद्यापिठ नसलेल्या प्रमाणपत्रांच्या बोगस असण्याची माहिती मागविली नसल्याने तालुक्यातील बोगस माध्यमिक शिक्षकांना यावेळीतरी अभय मिळाल्याचे गटशिक्षणाधिकारी साळुंखे यांनी स्पष्ट केले. पोलादपुर तालुक्यातील संदर्भित बोगस शिक्षकांच्या चौकशीसाठी रायगड शिक्षणाधिकारी यांच्याकडे 13 केंद्रातील एकुण 42 प्राथमिक शिक्षकांचे प्रमाणपत्र पोलादपुर गटशिक्षणाधिकारी साळुंखे यांनी पाठवली असल्याचे सांगितले.

Exit mobile version