साताऱ्याची नांदेडवर मात

ठाणे – कुमार- कुमारी राज्य कबड्डी निवड चाचणी 2023; कुमार गटात परभणी, मुंबई उपनगर पश्चिम पुढच्या फेरीत

| ठाणे | प्रतिनिधी |

येथील स्वर्गीय आनंद दिघे क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 50 वी सुवर्ण महोत्सवी मुख्यमंत्री चषक कुमार- कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कुमार विभागात- फ गटात सातारा संघाने नांदेड संघावर 47-30 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यांतराला सातारा संघाकडे 22-19 अशी आघाडी होती. सातारा संघाच्या चैतन्य पाटील व आशिष करण यांनी जबरदस्त खेळ करीत विजय सोपा केला. तर अर्थव सावंत व प्रणव धुमाळ यांनी चांगल्या पकडी घेत नांदेडचे आक्रमण परतवून लावले. नांदेडच्या याकुब पठाण व विशाल बेडगे यांनी चांगला प्रतिकार केला. तर संदेश राठोड व आर्य़न धावले यांनी पकडी घेतल्या.

इ गटात मुंबई उपनगर पश्चिम संघाने बीड संघावर 50-38 अशी मात करीत विजय मिळविला. मुंबई उपनगर पश्चिम संघाकडे मध्यंतराला 23-20 अशी निसटती आघाडी होती. उपनगर पश्चिम संघाच्या रजत राजकुमार सिंगने चौफेर हल्ला चढवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर ओम कुडले यांनी पकडी घेत चांगली साथ दिली. बीडच्या राहुल टेके याने चांगला प्रतिकार केला. तर संदेश देशमुख यांने पकडी केल्या. ड गटात अत्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात परभणी संघाने हिंगोली संघावर 39-38 अशी अवघ्या एक गुण फरकाने विजय मिळविला. मध्यंतराला परभणी 15-26 असा पिछाडीवर होता. मात्र मध्यंतरानंतर परभणी संघाच्या अंकुश भांडे व बाबुराव जाधव यांनी जोरदार आक्रमण करून हिंगोलीच्या संघाचा बचाव भेदला व आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यांना अतुल जाधव व विजय तरे यांनी पकडी घेत चांगली साथ दिली त्यामुळे विजय मिळविणे शक्य झाले. हिंगोलीच्या संघाचा मध्यंतरानंतर बचाव व आक्रमण ढेपाळले. त्यामुळे त्यांना आपली आघाडी राखण्यात यश आले नाही पर्यायाने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हिंगोलीच्या दिगु दहातोंडे व लखन राठोड यांनी जोरदार चढाया केल्या. तर चैतन्य पावले, सचिन चव्हाण यांनी चांगल्या पकडी घेतल्या.

कुमारी विभागात- सायंकाळच्या सत्रात ग गटात झालेल्या सामन्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड संघाने नाशिक शहर संघावर 44-24 असा विजय मिळविला. मधंयतराला पिंपरी चिंचवड संघाकडे 28-11 अशी आघाडी होती. पिंपरी चिंचवडच्या मनिषा राठोड हिने चौफेर चढाया करीत प्रतिस्पर्धी संघाचा बचाव खिळखिळा केला. सिध्दी गायकवाड हिने सुरेख पकडी घेत संघाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला. नासिक शहर संघाच्या प्रियंता सुर्वे हिने जोरदार आक्रमण करीत पिंपरी चिंचवडच्या संघाचा बचाव भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला यश आले नाही. पुजा शिंदे हिने चांगल्या पकडी घेतल्या. फ गटात दुसऱ्या सामन्यात अहमदनगर संघाने बीड संघावर 75-12 असा दणदणीत एकतर्फी विजय मिळविला. मध्यंतराला अहमदनगर संघाकडे 42-4 अशी निर्णायक आघाडी होती. अहमदनगर संघाच्या वैष्णवी काळे व पुजा पाडवी यांनी चौफेर चढाया करीत मैदान दणाणून सोडले व बीडच्या संघाला हतबल केले. स्नेहा पवारा हिने सुरेख पकडी घेत विजय सोपा केला. बीडच्या मनिषा आडे व किरण कुटे यांनी चांगला खेळ केला. इ गटात तिसऱ्या सामन्यात जळगाव संघाने नांदेड संघावर 55-42 अशी मात करीत विजय मिळविला. मद्यंतराला जळगाव संघाकडे 33- 26 अशी आघाडी होती. जळगावच्या पुजा लोहार व ऋती महाजन यांनी जोरदार चढाया केल्या. ऋती महाजन हिने अष्टपैलू खेळ केला. नांदेडच्या सानिया अलिशेर हिने चांगल्या चढाया केल्या तर सानिया चौगुले हिने चांगल्या पकडी केल्या.

Exit mobile version