साताऱ्याच्या खेळाडूंची भारतीय तिरंदाजी संघात निवड

| नागठाणे | प्रतिनिधी |

एप्रिल महिन्यात होणाऱ्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेसाठी साताऱ्याच्या चार खेळाडूंचा समावेश एकाच वेळी भारतीय तिरंदाजी संघात झाला आहे. जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.

साहिल जाधव, ओजस देवतळे, मधुरा धामणगावकर अन्‌‍‍ आदिती स्वामी हे ते खेळाडू आहेत. कोलकत्ता येथील स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया तसेच नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणीतून आठ भारतीय खेळाडूंचा संघ निवडण्यात आला. त्यात चार सातारकर खेळाडू आहेत. ज्योती सुरेखा वेन्नम (आंध्र प्रदेश), प्रगती (दिल्ली), कुशल दलाल (हरियाना), अभिषेक वर्मा (दिल्ली) या अन्य खेळाडूंची ही निवड भारतीय संघात झाली आहे.

जागतिक तिरंदाजी स्पर्धेची पहिली फेरी 7 ते 12 एप्रिलदरम्यान मेक्सिको येथे होणार आहे. 5 ते 10 मे दरम्यान चीनमधील शांघाय चीन येथे दुसरी फेरी होणार आहे. साताऱ्यातील चारही खेळाडू कंपाउंड राउंड प्रकारात सहभागी होणार आहेत. सध्या हे सर्व खेळाडू साताऱ्यातील दृष्टी आर्चरी ॲकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण सावंत, सहाय्यक प्रशिक्षक शिरीष ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. या यशाबद्दल महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदुलकर, सातारा जिल्हा आर्चरी असोसिएशनचे सचिव चंद्रकांत भिसे, दृष्टी आर्चरी ॲकॅडमीचे अध्यक्ष सुजित शेडगे, राजेश देशमुख, उपाध्यक्ष महेंद्र कदम, सचिव सायली सावंत, संजय पवार, जितेंद्र देवकर, राजेंद्र माने, विनोद कदम तसेच विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

Exit mobile version