तळा तालुक्याचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही

अनंत गीतेंचा सुनील तटकरेंना टोला

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्याचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही, असा टोला इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांना लगावला. तळा शहरात आयोजित प्रचारसभेप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, शहर प्रमुख नजीर पठाण, संघटक विलास ठसाळ, शेकाप तालुका चिटणीस ज्ञानेश्वर भोईर यांसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनंत गीते यांनी सांगितले की, या निवडणुकीबाबत मला जराही चिंता नाही. रायगडच्या मतदारांवर माझा विश्वास आहे. माझी ही लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध सदाचार अशी असून, विरोधकांनाही माहिती आहे की, त्यांचा पराभव अटळ आहे. प्रत्येक ठिकाणी मतदारांचा मला भरभरून प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातील मुस्लिम समाज पूर्णपणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. यावेळी रायगडची जनता चित्र पालटविण्यासाठी सज्ज झालेली असून, येत्या सात मे रोजी रायगडची जनता सुनील तटकरेंना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी तळा तालुक्यातील इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version