हजारो भाविकांची होणार गर्दी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात नेरळजवळील कोलीवली येथे असलेल्या सटूआई देवीची यात्रा येत्या 31 डिसेंबर रोजी आहे. जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या सटूआई देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी तीन जिल्ह्यांतून भक्त येत असतात. यावर्षी ही यात्रा 31 डिसेंबर रोजी येत असल्याने यात्रा आणि थर्टी फर्स्ट एकत्र साजरे होणार आहे.
पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी सटूआई देवीच्या यात्रेला सुरुवात होते. भक्तगणांमध्ये आनंदाचे वातावरण असते. या सटूआईच्या साक्षात्काराची आणि शक्तीची अनुभूती अनेक भागात पसरली आहे. पूर्वीपासून कोलीवली गावात यात्रा भरत असल्याचे जेष्ठ मंडळी सांगतात. नवसाला पावणारी सटूआई असल्याने कोलीवली गावात देवीच्या दर्शनासाठी कर्जत तालुक्यासह कल्याण, भिवंडी, ठाणे, रायगड, पनवेल, लोणावळा, खंडाळा आदी ठिकाणाहून देवीभक्त येत असतात.
नवजात बाळाचे भविष्य अधोरेखित केले जाते अशी देवी भक्ताची श्रध्दा असल्याने संपूर्ण पौष महिन्यात भक्तांची गर्दी असते. मातेच्या पोटी जन्म घेणार्या प्रत्येक बाळाचे भविष्य सटुआई लिहून ठेवत असते, अशी आख्यायिका असून, त्या बाळाचे भविष्य उज्ज्वल राहावे यासाठी आणि अनेक दाम्पत्य आपल्या संतती सुख मिळावे यासाठी सटुआईला नवस करीत असतात. त्यामुळे घेतलेला नवस फेडण्यासाठी नेरळजवळ कशेळे रस्त्यावर असलेल्या कोलीवली गावातील सटुआईच्या भेटीसाठी भाविक हजारोंच्या संख्येने येत असतात. त्या भाविकांची नवस फेडण्यासाठी गर्दी प्रामुख्याने पौष मासारंभ या दिवशी भरणार्या यात्रेला होत असते. त्यावेळी नवस फेडण्यासाठी आलेले भाविक कोलीवली गावाच्या परिसरात जेवण बनवून खाऊन घरी परततात. कोणाताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असतो. त्यात यावर्षी थर्टी फर्स्ट याच दिवशी आल्याने यात्रेला गर्दी होण्याची शक्यता आहे.
नवस फेडण्यासाठी 15 दिवस
कोलीवली येथील यात्रेत पौष महिन्याचे पहिल्या दिवशी भक्त मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यामुळे वाद होण्याचे प्रसंग घडतात आणि त्यामुळे कुटुंबासह येणारे भक्त हे यात्रेला येण्याचे टाळू लागले. आता मागील काही वर्षात यात्रा झाल्यानंतर पुढील 15 दिवस भक्त देवीचा नवस फेडण्यासाठी येत असतात. त्यामुळे 15 दिवस यात्रा चालते आणि त्या काळात व्यवसाय वाढण्यास देखील मदत होते.
