अलिबागमधील सात्विक रायकर आणि अमेय वाजेंनी फुल्ल एव्हरेस्टींगची मोहिम केली फत्ते

सलग 41 तास सायकलिंग करीत गाठली 8 हजार 848 मीटर उंची
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
खुप अवघड असलेल्या फुल्ल एव्हरेस्टींगची मोहिम अलिबागमधील सात्विक रायकर आणि अमेय वाजे या दोघा कुमारांनी नुकतीच पार पाडली. या दोघांनी 8848 मीटर उंची गाठण्यासाठी त्यांनी सलग 41 तास सायकलिंग केलं आणि या काळात कार्ले खिंडीच्या 115 फेर्‍या त्यांनी पूर्ण केल्या. एव्हरेस्टींग हॉल ऑफ फेम मध्ये नाव नोंदवले जाणारे अलिबाग सायकल क्लब मधील हे दहावे ठरले आहेत.
भारतातल्या एव्हरेस्टींग ची सुरुवात 13 मार्च 2015 या दिवशी सुमित पाटील या अलिबागच्या सायकलपटूने केली. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे 13 मार्च 2020 मध्ये ग्रुप एव्हरेस्टींग ही संकल्पना त्यांनी सर्वांसमोर मांडली. त्यादिवशी 45 जणांनी एकत्र सायकलिंग करत सर्वानी मिळून 8848 मीटर ही उंची गाठत एव्हरेस्टींग पूर्ण केले. हा प्रकार वैयक्तिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे ते वैयक्तिक स्तरावर पूर्ण करायचा प्रयत्न अनेकांनी केला. बघता बघता एव्हरेस्ट हॉल ऑफ फेम मध्ये अलिबाग सायकल क्लबची 12 नावे नोंदवली गेली आहेत.
सात्विक रायकर वय 15 आणि अमेय वाजे वय 16 या दोघांनी 8848 मीटर उंची सायकलवर गाठताना कमाल केली.
23 डिसेंबर ला भल्या पहाटे साडेतीन वाजता कार्ले खिंडीत या जोडीने आपला प्रवास सुरू केला होता. या दोघांनी एवढ्या पहाटे कार्ले खिंडीत आपली एव्हरेस्टींग ची वाटचाल सुरू केली होती. दोघांनीही या आधी हाफ एव्हरेस्टींग केलं होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या सायकलींग चा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे साधारण 80 फेर्‍या पूर्ण होईपर्यंत सगळ ठीक सुरू होत. त्यानंतर मात्र अवघड वाटा लागल. 2, 3 फेर्‍या झाल्या की विश्रांतीचा वेळ वाढायला लागला. विश्रांती संपवून परत सायकलवर बसणे यासाठी स्वतःशीच बराच झगडा करायला लागला. पण हळूहळू फेर्‍यांचा आकडा वाढत होता. या वेळचे आव्हान आकडे यादृष्टीने दुप्पट असलं तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा अतिशय कठीण होतं. 8848 मीटर उंची गाठण्यासाठी त्यांनी सलग 41 तास सायकलिंग केलं आणि या काळात कार्ले खिंडीच्या 115 फेर्‍या त्यांनी पूर्ण केल्या.
हे आव्हान या दोघांनी पेलायचे ठरवले आणि अलिबाग सायकल क्लब मध्ये एक वेगळच उत्साहाचं वातावरण पसरलं. त्यांच्यासोबत सायकलिंग करता करता देवांश गावंड या केवळ 13 वर्षाच्या कुमाराने देखील 58 फेर्‍या पूर्ण करत आपले नाव हाफ एव्हरेस्टींग हॉल ऑफ फेम मध्ये नोंदवले. हा त्या वातावरणाचा परिणाम आहे हे निश्‍चित. मिलिंद पाटील वय 35 आणि मनोज भगत वय 56 यांनीदेखील हाफ एव्हरेस्टींग पूर्ण केले. अखेर रात्री 9 वाजता कार्लेखिंड या दोन वीरांच्या जयजयकाराने दुमदुमून गेली. 115 फेर्‍या पूर्ण करत सात्विक रायकर आणि अमेय वाजे या दोघांनी आपले नाव एव्हरेस्टींग हॉल ऑफ फेम मध्ये नावे नोंदवले होते.

आता पर्यंत अलिबाग सायकल क्लबमधून 10 जणांनी आपले नाव एव्हरेस्टींग हॉल ऑफ फेम मध्ये नोंदवले आहे. 6 जणांनी 2 वेळा आणि 4 जणांनी एकदा हा विक्रम केला आहे.

Exit mobile version