सत्यजित पाटलांची ‘मशाल’ जयंत पाटलांच्या हाती!


| इस्लामपूर | वृत्तसंस्था |

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील-सरुडकर यांची महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी घोषित झाल्याने जयंत पाटील यांची जबाबदारी वाढली आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीत न आल्यास आम्हाला दुसरा उमेदवार देण्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी या पूर्वी माध्यमांना दिली होती. त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाशी अत्यंत अल्पपरिचय असलेले सत्यजित पाटील यांची पर्यायाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मदारही जयंत पाटलांच्या खांद्यावर असणार आहे.

सत्यजित पाटील – सरुडकर हे या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय पक्षांच्या महायुतीकडून उमेदवारी करीत आहेत. महायुतीने ही जागा घेताना हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी व इस्लामपूर या मतदारसंघात चाचपणी करून विजयाची गणिते मांडत उमेदवार दिला आहे. हातकणंगलेतील इस्लामपूर व शिराळा हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रभावाखाली येतात. या ठिकाणी काँग्रेसचीही बर्‍यापैकी ताकद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची ताकद अत्यल्प आहे. त्यामुळे सत्यजित पाटील यांचे शिवधनुष्य या मतदारसंघात जयंत पाटील यांना उचलावे लागणार आहे.

Exit mobile version