| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्यातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय किल्ले रायगड गडारोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि.11) सकाळी 7 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटात 450 स्पर्धाकांनी सहभाग घेतला असून ही स्पर्धा यावर्षी एकूण आठ गटांमध्ये घेण्यात आली. यामध्ये सुधागड तालुक्यात चेरफळ वाडीतील सौरभ हरिकेश हंबीर याने 26 मिनिटात रायगड किल्ला सर करून चौथा क्रमांक यावेळी मिळविला. सुधागड तालुक्यातील उध्दर पंचक्रोशीत चेरफळ वाडीतील सौरभ हंबीर याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. धावण्याचा सराव करण्यासाठी त्याचे वडील हरिकेश मदत करीत आहेत. त्याच्याच वाडीतील राजू बांगारे, हरिकेश हंबीर, संजय निरगुडे, मनोहर हंबीर, साईल हंबीर यांनीही सहभाग घेऊन स्पर्धा पूर्ण करून प्रमाणपत्र मिळविले.







