सवतकडा धबधबा पर्यटकांना खुणावतोय!

मुरूड तालुक्यात निसर्गाचा अविस्मरणीय आविष्कार; दुधाळ धबधब्यांच्या सरींनी खुलले सह्याद्रीचे सौंदर्य

| आगरदांडा | प्रतिनिधी |

पावसाने दमदार हजेरी लावताच मुरूड तालुक्यातील डोंगरदऱ्या नवचैतन्याने बहरल्या असून, वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 200 फूट खोल सवतकडा धबधबा पुन्हा एकदा फेसाळत्या जलधारांसह प्रवाहित झाला आहे. दाट हिरवाई, धुक्याची चादर आणि खळाळत कोसळणाऱ्या दुधाळ धबधब्यांचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले आता या निसर्गरम्य स्थळाकडे वळू लागली आहेत.

सायगाव गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्याकडे जाणारा मार्ग घनदाट वृक्षराजी आणि डोंगररांगांमधून जातो. या पायवाटेवरून चालताना उजव्या बाजूला डोंगरातून कोसळणाऱ्या दुधाळ धबधब्यांची अखंड रांग नजरेत भरते. प्रत्येक धबधबा वेगळे सौंदर्य उलगडत पर्यटकांना थांबून निसर्गाचा आनंद घेण्यास भाग पाडतो.

धबधब्याच्या दिशेने वाटचाल करताना अंगावर उडणारे थंडगार पाण्याचे तुषार आणि डोंगरातून वाहणाऱ्या वाऱ्याची आल्हाददायक झुळूक मनाला प्रसन्न करून जाते. धबधब्याचा खळाळता आवाज, हिरव्या गर्द वनराईचे सान्निध्य आणि पावसाळी वातावरण यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला निसर्गाच्या कुशीत हरवून गेल्याचा अनुभव येतो. अनेक पर्यटक धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आनंद लुटत आहेत, तर काही जण या नयनरम्य दृश्यांची छायाचित्रे आणि सेल्फी आपल्या कॅमेऱ्यात टिपताना दिसून येतात.

सवतकड्याच्या खोल दरीत पसरलेले दाट धुके हे येथील आणखी एक वैशिष्ट्य आहे. दरीत डोकावल्यावर धुक्याच्या पडद्यामुळे काहीच दिसत नाही. मात्र, काही क्षणांनी हेच धुके वर सरकू लागते आणि क्षणार्धात संपूर्ण परिसर स्वर्गीय रूप धारण करतो. हा निसर्गाचा चमत्कार अनुभवताना पर्यटक अक्षरशः भारावून जातात.
कोकणाला लाभलेल्या निसर्गसंपदेचे हे एक अद्वितीय रूप मानले जाते. पावसाळ्यात हिरवागार शालू परिधान केलेले डोंगर, नागमोडी वळणांचे रस्ते, डोंगरकपारीतून कोसळणारे निर्झर आणि धुक्याने वेढलेला परिसर यामुळे मुरूड तालुक्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. त्यामुळे सवतकडा धबधब्यासह गारंबी धरण, आंबोली धरण आणि परिसरातील इतर पर्यटनस्थळांवरही पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, खोल पाण्यात उतरणे टाळावे, मद्यपान करून धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि परिसर स्वच्छ ठेवून निसर्गाचे जतन करावे, असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version