अपघातग्रस्तांचे प्राण वाचवा; लाखांचा पुरस्कार मिळवा

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत रूग्णालयात पोहचविणार्‍यांना जिल्हास्तरावर पाच हजार रुपये मिळतील. शिवाय राज्यभरातून यातील दहा जणांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य परिवहन आयुक्तांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाला तसे निर्देश दिल्याची माहिती आहे. या उपक्रमामुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यास नक्कीच मदत मिळेल
शहरासह जिल्ह्यातील विविध गावांतून जाणार्‍या रस्त्यांवर तसेच महामार्गावरील होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस आणि वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविले जातात. सर्वात जास्त अपघात हे महामार्गावर होत असून अनेकांना नाहक जीव गमवावा लागतो. मात्र, आता अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणार्‍यांना राज्य आणि जिल्हास्तरावर रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना तात्काळ मदत पोहचविण्यासाठी मृत्यूंजय दूताचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्हास्तरावर पाच हजार व सन्मानचिन्ह
अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत रुग्णालयात पोहचविल्यास त्या नागरिकाला जिल्हास्तरावर पाच हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

राज्य स्तरावर दहा जणांना लाखाचा पुरस्कार
अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोहचवून रुग्णालयात पाठवून मदत करणार्‍याला राज्यस्तरावर ही पुरस्कृत केले जाणार आहे. राज्यातील दहा जणांची निवड करुन त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यामुळे अपघातग्रस्तांचा जीव वाचण्यास एकप्रकारे मदत मिळणार आहे.

Exit mobile version