दोन वर्षांत अपघातातील 55 जणांचा वाचवला जीव
। पनवेल । प्रतिनिधी ।
उरण-जेएनपीटी महामार्गावरून प्रवास करणार्या वाहनाचा प्रवास वेगवान आणि सुखकर व्हावा, यासाठी एनएचएआय प्रयत्न करत आहे. याकरिता एनएचएआयच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत देता यावी, याकतिा कळंबोली सर्कल ते डी पॉईंट तसेच पळस्पा फाटा ते डी पॉईंटदरम्यानच्या 11 किलोमीटरच्या मार्गावर विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाने केलेल्या मदतीमुळे मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 55 अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत.
नवी मुंबई, कळंबोली सर्कल तसेच पनवेल पळस्पा फाटा येथून जेएनपीटी बंदराला जोडणार्या महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय 2014 साली घेण्यात आला होता. जेएनपीटी आणि नॅशनल महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या या महामार्गाचे काम अद्यापही सुरु आहे. महामार्गाच्या या कामामुळे महामार्गावरील प्रवास वेगवान होणार असल्याने अपघातांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघातप्रसंगी तात्काळ मदत पोहोचवता यावी, या हेतूने एनएचआयकडून विशेष उपाय योजना राबवल्या जात आहेत. एनएचएआयतर्फे महामार्गावर प्रत्येक दोन कि.मी. अंतरावर एसओएस बूथ (सर्व्हिस ऑफ सॅटेलाईट) यंत्रणा बसवण्यात आली आहे.
या यंत्रणेचा वापर करणार्या अपघातग्रस्ताला तात्काळ मदत मिळावी, यासाठी डी पॉईंट या ठिकाणी विशेष कक्ष तयार करण्यात आला असून, अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवली जात असल्याने अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचले असल्याची माहिती कंट्रोल रूममध्ये कार्यरत असलेले अधिकारी राजू बांदन यांनी दिली आहे.
सद्यःस्थितीत 11 किमीवरच सेवा कार्यरत कळंबोली सर्कल ते जेएनपीटी बंदर तसेच पळस्पा फाटा ते जेएनपीटी बंदर या जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर अंतराच्या महामार्गावर कळंबोली सर्कल ते डी पॉईंट, पळस्पा फाटा ते डी पॉईंट या 11 कि.मी.च्या अंतरावरच सध्या अपघातग्रस्तांना पथक तात्काळ मदत पोहोचवू शकत आहे. भविष्यात संपूर्ण महामार्गावर अशा पद्धतीने तात्काळ मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मदतीसाठी 15 कर्मचारी तैनात एनएचएआयतर्फे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचवता यावी, याकरिता तयार करण्यात आलेल्या पथकात 15 कर्मचारी तैनात आहेत. त्यासोबत डी पॉईंट येथे 24 तास सुविधा पुरवण्यासाठी एक रुग्णवाहिका, 1 पेट्रोलिंग व्हॅन आणि 1 क्रेन तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या मार्गावर लक्ष ठेवण्याचे कामदेखील करण्यात येत आहे. पावसाळ्यात अनेकदा एसओएस बूथ प्रणालीत बिघाड होत असल्याने या बूथवर अपघातग्रस्तांकरिता महत्वाचा क्रमांक देण्यात आला आहे.