चरी येथे मुलींना मोफत सायकलींचे वाटप
| भाकरवड | वार्ताहर |
शिकला तो टिकला, मुलांबरोबरच मुलींनाही शिक्षणाची दारे आता खुली आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी शेकापचे नेहमीच पाठबळ राहील, अशी ग्वाही माजी आ. पंडित पाटील यांनी चरी येथे दिली.
शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने चरी येथे शनिवारी विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी पंडित पाटील हे बोलत होते. चित्रलेखा पाटील, माजी जि.प. सदस्या भावना पाटील, चरी सरपंच नीलम पाटील, उपसरपंच अभय पाटील आदींच्या उपस्थितीत या सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी चित्रलेखा पाटील यांनीही मोफत सायकलींमुळे आता मुलींच्या शिक्षणाला वेग येणार आहे. त्यांचा त्रास कमी होणार असल्याचे नमूद केले. तसेच मुलींना मोफत सायकली मिळाव्यात यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला, त्यांचेही त्यांनी आभार मानले. यावेळी 39 सायकल वाटप करण्यात आल्या.
चित्रलेखा पाटील यांनी 2019 मध्ये सायकल वाटप कार्यक्रमाची सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 15 हजार सायकल वाटप केल्या. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सीएफटीआय आणि एसओआय यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोफत सायकलींबरोबरच शिलाई मशीन, शैक्षणिक साहित्य, सतत तीन वर्षे देत आले आहेत. कोरोनाच्या महामारीत वैद्यकीय शिबीर आयोजित केला होता. त्याबद्दलही धन्यवाद देण्यात आले.
पंडित पाटील यांनी शेकापचे योगदान व केलेल्या कार्याचा आढावा घेतला. लाभार्थी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले व उत्स्फूर्त सायकल सवारी केली. याप्रसंगी मंगेश पाटील व थळे गुरुजी यांनी मत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनोज थळे यांनी केले. आभार वि.का. पाटील यांनी मानले.
राजकारणाबरोबरच समाजकारण हा शेकापचा पिंड आहे. त्यास अनुसरुनच आताची पिढी समाजासाठी काहीतरी देणं लागतो, या भावनेेने प्रामाणिकपणे काम करीत आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.
पंडित पाटील, माजी आमदार