भरकटलेल्या आठ जणांचे जीव वाचवले

| पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल शहराजवळील नांदगावजवळील पाच पीर डोंगर निसर्ग हॉटेलच्या मागे डी पॉईंट येथे आज सकाळी नेरुळ परिसरात राहणारे एक कुटुंब व त्यांचा मित्र परिवार असे 8 जण ट्रेकींगसाठी गेले असता ते मुसळधार पाऊस व धुक्यामुळे भरकटले होते. परंतु स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पनवेल शहर पोलिसांनी या आठही जणांना रेस्क्यू करून सुखरुपपणे खाली उतरविण्यात आले आहे.

नवी मुंबई येथील नेरुळ या ठिकाणी राहणारे पवार कुटुंबीय व त्यांचा मित्र परिवार असे 8 जण आज सकाळी 11 च्या सुमारास पनवेल शहराजवळील नांदगावजवळील पाच पीर डोंगरावर ट्रेकींगसाठी गेले होते. परंतु दुपारच्या वेळेस अचानकपणे वाढलेला पाऊस व दाट धुक्यामुळे ते रस्ता चुकले व भलत्याच ठिकाणी पोहोचले. आपण वाट चुकल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपत्कालीन विभागाशी संपर्क साधला. तात्काळ सदर विभागाने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधून अडकलेल्या 8 जणांबाबत माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण भगत, सहा.पो.निरीक्षक केदार, पो.उपनिरीक्षक विनोद लबडे, पो.हवालदार किशोर बोरसे, परेश म्हात्रे, पो.हवा.मुरली पाटील, पोलीस नाईक भाऊसाहेब लोंढे, यांच्यासह नांदगांवचे माजी सरपंच संजय पाटील, अ‍ॅड. घरत व ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावले व त्यांनी सदर डोंगर पिंजून काढून 2 तासानंतर या 8 जणांना ताब्यात घेवून सुखरुपपणे खाली उतरविले. याबद्दल या 8 जणांनी पनवेल शहर पोलीस व ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version