। उरण । वार्ताहर ।
चिरनेर रांजणपाडा येथील युवकांनी 30 फूट कोरड्या विहरीत पडलेल्या 8 ते 10 दिवसांच्या गाईच्या वासराला जीवदान दिले. दि.22 फेब्रुवारीच्या रात्री 11 ते बुधवार दि.24 च्या पहाटे 1 वाजेपर्यंत हे बचावकार्य चालू होते. रात्रीचा अंधार व 30 फूट कोरडी विहीर असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता जिगरबाज कामगीरी करणार्या या युवकांचा सर्व स्थरावरुन कौतूक होत आहे.
याबाबत सह्याद्री प्रतिष्ठानचे अलंकार ठाकूर यांनी दिलेल्या माहीतीनुसार, चिरनेर-रांजणपाड्यातील युवकांना मंगळवार रात्री 11 च्या दरम्यान माहिती मिळाली की, गावाच्या बाहेर डोंगराळ भागातील एका शेतात असलेल्या विहिरीत गाईचे वासरू पडले आहे. त्या वासराला वाचविण्यासाठी कुमार ठाकूर हा तरुण कंबरेला दोर बांधून त्या विहिरीत उतरला. त्या वासराला योग्य प्रकारे दोरीने बांधून विहिरीच्या काठावर आपल्या मित्रांच्या सहाय्याने सुरक्षितरित्या बाहेर काढून जिव वाचविला.
सदर मोहिमेत नरेंद्र ठाकूर, प्रशांत ठाकूर, अलंकार ठाकूर, तेजस ठाकूर, केतन ठाकूर, आशिष भालेकर, सूरज ठाकूर व अनुज ठाकूर यांनी मोलाची मदत केली.