। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग-मुरूड-रोहा मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ सुतारपाडा येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले. तसेच, राज्यातील चांगले सरकार पाडले. त्यामुळे राज्यातील जनता त्यांना माफ करणार नाही. आपण सर्वांना सोबत घेऊन अलिबाग-मुरूड-रोहा मतदार संघाचा विकास करू. तसेच, महिलांच्या सक्षमीकरणासाठी अलिबाग तालुक्यात महिला बचत गट भवन उभारणार असल्याचे प्रतिपादन चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी केले आहे.
तसेच, चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी मतदार संघात विद्यार्थीनींना मोफत सायकली वाटप, तसेच कोरोना काळात रुग्णांना मदत व अन्नधान्य वाटप करून आपल्या कामाचा ठसा उमटिवला आहे. अशा कार्यतत्पर उमेदवाराला मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन काँग्रेस नेते चंद्रकांत मोकल यांनी केले आहे. यावेळी को.ए.सोचे कार्यवाहक अॅड. गौतम पाटील, काँग्रेस नेते चंद्रकांत मोकल, शिवसेना (उद्धव ठाकरे) अलिबाग तालुका प्रमुख कैलास गझने, शेकापचे सुरेश गझने, राजन गिरी, संदीप वाघपंजे, सरपंच अजिता गावंड-गझने, संजय पाटील, सुरेश गिरी, परशुराम गझने व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.