| चाणजे | वार्ताहर |
देशातील पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या करून स्वाभिमानाने जगण्याचे सामर्थ्य दिले आहे. याची उत्तराई म्हणून आपण सावित्रीच्या लेकी या नात्याने आपण आपल्या परीने समाजोपयोगी कार्य करावे, असे आवाहन उरण सामाजिक, शैक्षणिक व जनजागृती संस्थेच्या उपाध्यक्षा सीमा घरत यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या की, महिलांना उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे त्या उद्योजिका व्हाव्यात या हेतूने संस्थेतर्फे महिलांसाठी ‘मी उद्योजिका उरणची’ हा व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू करून महिलांना उद्योग क्षेत्रात कार्य करण्याचे प्रोत्साहन व त्यांचे कौतुक करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे, या ग्रुपवर अनेक महिला उद्योजिकांनी प्रमोशन करून महिला उद्योजक आहेत याची जाणीव करून दिली. सावित्रबाई फुले जयंती व या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिला उद्योजिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षा नीलमा थळी, सचिव स्मिता पाटील, उपाध्यक्षा सीमा घरत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. संस्थेच्या संस्थापिका गौरी देशपांडे यांनी प्रास्ताविक केले, तर नीलिमा थळी यांनी स्वागत केले.
यावेळी पीएसआय पद्मजा पाटील यांनी सायबर क्राईम व महिला सुरक्षितताबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी गोपनीय शाखेच्या पोलीस अधिकारी मानसी तांबोळी व पोलीस बंधू तसेच उपाध्यक्षा कल्याणी दुखंडे, गौरी मंत्री, अफशा मुकरी, दीपा मुकादम, ज्योत्स्ना येरुणकर, नाहिदा ठाकूर, प्रगती दळी, स्मिता पाटील, महिला उद्योजिका विदुला कुलकर्णी व पूनम पाटेकर उपस्थित होत्या.