सयाजी शिंदेंचा टोरंटविरोधात संतापाचा उद्रेक

| नेरळ/कर्जत | प्रतिनिधी |

टोरंटसाठी झाडे कापणारे झाडखाऊ आहेत, तर त्यासाठी दलाली करणारे भाडखाऊ आहेत, असा जाहीर आरोपही त्यांनी केला. 32 हजार नव्हे, तर 32 लाख झाडे तोडणार आहेत, असा गंभीर दावा करत झाडे तोडण्याची परवानगीच द्यायची नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कर्जतच्या लोकमान्य टिळक चौकात शनिवारी (दि.7 ) झालेल्या ‌‘सेव्ह सह्याद्री‌’च्या सभेत शिंदे यांनी टोरंट प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका मांडत उपस्थितांना झाडे वाचविण्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले.


मला माझ्या आईने झाडाचे महत्त्व सांगितले आहे. झाड हेच आपले जीवन आहे आणि त्यामुळे कोणालाही झाड तोडून देणार नाही, असा ठाम इशारा सयाजी शिंदे यांनी दिला. झाडे तोडली जात असताना त्यावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांच्या जीवनाचे काय होणार, याचा विचार कोण करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कापलेल्या झाडांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या शोकसभेला नेत्यांनी यायला हवे होते. मात्र, त्यांना त्यासाठी वेळ मिळाला नाही, अशी टीका त्यांनी केली.

सेव्ह सह्याद्रीच्या निमित्ताने कर्जत येथे पर्यावरणप्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे तसेच विद्यार्थी नेते विवेकानंद पाटील यांची जाहीर सभा लोकमान्य टिळक चौकात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पर्यावरणप्रेमी विजयसिंह पाटील, शरद शेलार, अभिजित खरात, कर्जत बचाव समितीचे समन्वयक ॲड. कैलास मोरे, कर्जतच्या नगराध्यक्ष पुष्पा दगडे, शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, वंचितचे जिल्हा महामंत्री धर्मेंद्र मोरे, आरपीआयचे कोकण संघटक राहुल डाळींबकर, शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख बाजीराव दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शंकर भुसारी, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय गवळी यांच्यासह पर्यावरण बचाव समितीला पाठिंबा देणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सभेच्या प्रास्ताविकात कर्जत बचाव समितीचे प्रवीण गांगल यांनी कर्जत तालुक्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. तर ॲड. कैलास मोरे यांनी टोरंट प्रकल्पाला विरोध का, असा प्रश्न उपस्थित केला. शासन हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचे सांगते, मग शासनाची भूमिका स्पष्ट का नाही? हा प्रकल्प आणण्याचा घाट कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. पाणी किती अडवणार? आमचे तोंडाचे पाणी पळवणार आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न नव्याने उभा राहणार आहे. कर्जतमध्ये तीन लाख लोक राहतात, पण आम्हाला पाणी कोण देणार? झाडे तोडली तर ऑक्सिजन कुठून आणणार? असे प्रश्न उपस्थित करत कर्जत वाचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

आई म्हणजे झाड; मरेपर्यंत झाडे तोडू देणार नाही!
1992 मध्ये माझी आई गेली आणि त्यानंतर आईनंतर श्रेष्ठ झाड आहे हे समजून देवराई फुलवत आहे. झाडाने आपल्याला जगवले आहे. झाड आपल्याला ऑक्सिजन देते. झाडे वाचली तरच आपण जगणार आहोत. ते नेतेमंडळी पण जगतील, हे त्यांना कधी समजेल? मी मरेपर्यंत सोडणार नाही आणि झाडे तोडू देणार नाही. येथे तुम्ही एकत्र राहा. त्यावेळी मी एक लाख लोक येथे आणतो आणि हे प्रकल्प येथून हटवू, असे जाहीर आव्हान सयाजी शिंदे यांनी दिले.
32 हजार नाही, तर 32 लाख झाडे तोडणार!
32 हजार झाडे दाखवून तोडण्याची परवानगी द्यायची आणि प्रत्यक्षात तेथे 32 लाख झाडे तोडणार आहेत, हे मनात नक्की समजा. वन विभाग बेजबाबदार आहे. 100 फूट उंचीची झाडे तोडली आहेत. वन विभाग कुठे झाडे लावतो, तेथे गवतदेखील मोजणार, असे सांगत त्यांनी वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
झाडखाऊ नेते, भाडखाऊ दलालांना हाकला!
रोज झाडे तोडण्याचा बाजार भरला आहे. झाडखाऊ नेते आणि भाडखाऊ म्हणजे दलाल यांना हाकला. दलाल लोकांना जवळ उभे करू नका. पैसा हा भयानक रोग आहे. डोंगर चढत असताना ऑक्सिजन मिळाला नाही तर जगणार कसे, असा सवाल करत पैसे घेऊन चूक करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
सह्याद्रीचे अंत्यदर्शन करून जा!
सह्याद्रीतील तुटलेली झाडे शेवटची झाडे आहेत. तेथे तुटलेली झाडे, त्यांचे अंत्यदर्शन करायला येऊन जा. नाहीतर सह्याद्री बघायला मिळणार नाही; पण भूतकाळात सह्याद्री होता, हे दिसून येईल, अशा शब्दांत त्यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासाचे गांभीर्य मांडले. राज्यभरातून माणसे आलेली आहेत. यापुढे टोरंट उद्ध्वस्त करायला आणि हाकलून लावायला तुमची गरज लागणार आहे, असेही ते म्हणाले.
पेज नदी वाचवणार!
रक्तवाहिन्या आटवण्याचे काम सुरू आहे. पेज नदी वाचवायची आहे. झाडे वाचवली तर पेज नदीही वाचेल आणि सर्व काही वाचेल, असे ठाम प्रतिपादन सयाजी शिंदे यांनी केले.
Exit mobile version