आरुष कोल्हेची दमदार शतकी खेळी
| पोयनाड | क्रीडा प्रतिनिधी |
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रवींद्र चवरकर स्मृतिचषक एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड संघाने करण क्रिकेट अकॅडमी कामोठे संघावर विजय मिळवला आहे.
नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड संघाने धुवाधार फलंदाजी केली. सलामीवीर अष्टपैलू खेळाडू आरुष कोल्हे याने चौफेर टोलेबाजी करत शतक ठोकले. त्याने 108 चेंडूंचा सामना करत 17 चौकार आणि 9 षटकार ठोकत 160 धावा काढल्या. दुसऱ्या बाजूने रोशनी पारधी हिने आरुषला साथ देत 61 धावांचे योगदान दिले. दोघांनी 219 धावांची भागीदारी केली. अमर बी.के याने मधल्या फळीत 50 धावा काढल्या. 40 षटकांच्या समाप्तीनंतर महाड संघाने 321 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कामोठे संघाकडून पियुष दांडेकरने 2, कल्पित कोळीने एका फलंदाजाला बाद केले.
प्रत्युत्तरात करण क्रिकेट अकॅडमी संघाने 29 षटकांमध्ये सर्व गडी गमावत 110 धावाच केल्या. वेदांत शिंदेने 16 धावा काढल्या. महाड संघाकडून शिवा कुशवाहने 3, प्रचिती जाधव व अश्वत तेगवान यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. शतकवीर अष्टपैलू खेळाडू आरुष कोल्हे याला सामनावीर, पियुष दांडेकर स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, इमार्जिंग प्लेअर प्रचिती जाधव, अमर बी.के., आयुष शिर्के, वेदांत शिंदे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आर्यन पांडे, अल्तामाश खान यांना झुंझारचे सचिव किशोर तावडे, पोयनाड व्यापारी असोसिएशनचे सदस्य अशोक जैन, योगेश तावडे, संदीप जोशी, करण कांबळे, आवेश चीचकर, संकेश ढोले, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
