जे.एस.एम. महाविद्यालयामध्ये शिष्यवृत्ती माहिती कार्यक्रमाचे आयोजन

विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समाज कल्याण कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय दिन व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिष्यवृत्ती माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख डॉ. निळकंठ शेरे व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. प्रेम आचार्य प्रमुख व्यख्याते म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, शिष्यवृत्ती समितीप्रमुख प्रा. के.बी. चौगुले, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. श्वेता पाटील, समाज कल्याण कार्यालयाच्या अधीक्षक माधुरी पाटील, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रसाद लवटे, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी मोनिका काळे, मंदाकिनी कांबळे, तसेच समाज कल्याण कार्यालयातील पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय दिन व राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गायकवाड यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रम आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. तसेच, त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक, शैक्षणिक व आरक्षणविषयक कार्यातील योगदान विशद केले व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. समाज कल्याण कार्यालय अधीक्षक माधुरी पाटील यांनी संविधान उद्देशीकेचे वाचन केले व समाज कल्याण कार्यालयाच्या कामाची माहिती दिली. यावेळी समाज कल्याण कार्यालयातर्फे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय हा ग्रंथ प्राचार्य व उपप्राचार्य यांना भेट दिला. तसेच, विद्यार्थ्यांना संविधान उद्देशीका प्रतीचे वाटप करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, अश्विनी आठवले व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. श्वेता पाटील यांनी केले. तसेच, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. अश्विनी आठवले यांनी केले.

Exit mobile version