रायगडात शाळेची घंटा ऑनलाईनच!

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्य शासनाने 24 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी रायगडात मात्र शाळेची घंटा वाजलीच नाही. जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही आदेश शाळा सुरू करण्याबाबत जारी केले नसल्याने रायगडमधील शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. सरकारचे आदेश शाळा सुरू करण्याबाबत आले असले तरी जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही आदेश जाहीर केले नसल्याने शाळा प्रशासन शाळा सुरू करण्याबाबत द्विधा मनःस्थितीत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आदेश आल्यानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय अनेक खासगी शाळांनी घेतला आहे. एक-दोन ठिकाणी जिल्ह्यात शाळा सुरू करण्यात आली आहे. रायगडात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत असून, रोज हजारच्या संख्येने रुग्ण बाधित होत आहेत. असे असले तरी कोरोनाबाधित रुग्ण हे घरीच उपाचार घेत आहेत. सध्या जिल्ह्याची रुग्णसंख्या बारा हजारांवर पोहोचली आहे. शासनाने शाळा सुरू करण्याबाबत आदेश जारी केले असले तरी जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती पाहून अद्याप शाळा सुरू करण्याबाबत कोणतेही आदेश प्रशासनाने जारी केलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात आज 24 जानेवारी रोजी शाळेची घंटा वाजली नसल्याने ऑनलाईन वर्ग अद्यापही सुरूच आहेत.

अजून तरी रायगड जिल्ह्यातील 11 वी, 12 वीचे वर्ग वगळता कोणत्याही शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे शाळांची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी निर्णय घेतील, त्यानुसार अमंलबजावणी करतील. – जोत्सना शिंदे-पवार, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

Exit mobile version