निगडी शाळेत निवडले शालेय मंत्रिमंडळ

ईव्हीएम अ‍ॅपचा केला मतदानासाठी वापर

। म्हसळा । वार्ताहर ।

15 जुन पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून रायगड जिल्हा परिषद शाळा निगडी येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 2 आणि शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शनिवारी (दि.22 ) शाळेत ईव्हीएमसारख्या अ‍ॅपव्दारे प्रत्यक्ष निवडणूक घेऊन शालेय मंत्रिमंडळ नेमणूक करण्यात आली.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया समजून देण्यात आली. विद्यार्थ्यांमधून उमेदवार निवडून प्रचार करणे, प्रत्यक्ष मतदान नोंदवहीत नाव नोंदवणे, हाताला शाई लावणे आणि प्रत्यक्ष ईव्हीएमवर मतदान करणे, निकाल पाहणे इत्यादी प्रात्यक्षिक उपक्रम घेण्यात आले. शालेय मंत्रिमंडळ निवडणूक जय शिवराय गट, राजमुद्रा गट आणि रायगड गट अशी तिरंगी लढत झाली. निवडणुकीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. त्यात राजमुद्रा गटाने विजय मिळविला. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राजमुद्रा आणि रायगड गटाने युती करून मंत्रिमंडळ स्थापन केले. राजमुद्रा गट अध्यक्षा प्रज्ञा प्रदीप पाखड यांची शालेय मंत्रिमंडळ मुख्यमंत्रीपदी, उपमुख्यमंत्रीपदी समित संतोष भुवड तर शिक्षणमंत्री म्हणून वेदिका म्हांदळेकर तसेच विरोधी पक्ष नेता म्हणून आयुष जयवंत मोरे यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यानी अतिशय उत्साहात निवडणूक प्रक्रिया पार पाडली. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद मोरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

निकालानंतर नवीन शालेय मंत्रिमंडळाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि शिक्षकांकडून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सदर निवडणूक पार पाडण्यासाठी विषय शिक्षक रामेश्‍वर पासले, सहशिक्षक भीम यादव यांनी निवडणूक अधिकारी तर मुख्याध्यापक रमेश जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पार पाडले. शिक्षणप्रेमी महादेव पाटील, सरपंच वेदिका पाखड, उपसरपंच जयवंत मोरे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. शाळेत असे नवनवीन उपक्रम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शाळा समिती, पालक यांनी अभिनंदन केले. शालेय मुख्यमंत्री प्रज्ञा पाखड आणि उपमुख्यमंत्री समित भुवड यांनी मतदार विद्यार्थ्यांचे आभार मानले.

Exit mobile version