। पनवेल । वार्ताहर ।
लहान मुलांना शालेय वयातच लोकशाहीचे धडे मिळावेत, यासाठी कळंबोलीतील ज्ञानमंदिर शाळेमध्ये मतदान पद्धतीने वर्ग प्रतिनिधींची निवडणूक करण्यात आली. शाळेमध्ये मतदार याद्या तयार करण्यापासून मतदान, मतमोजणी या प्रक्रियेमध्ये फक्त विद्यार्थी सहभागी झाले होते. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यात आल्याने या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
पाचवी ते दहावी वर्गांमध्ये प्रतिनिधी निवडून देण्यासाठी कळंबोली येथील ज्ञान मंदिर शाळेमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी अगोदरच विद्यार्थ्यांमधून मतदारांची नोंदणी करण्यात आली. मतदारयाद्या तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. या याद्या अंतिम झाल्यानंतर निवडणूक जाहीर करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरणे, त्याचबरोबर त्याची छाननी आणि अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली होती. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी पार पाडावी, यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्यांशी केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी यांची निवड करण्यात आली.
दुबार मतदान होऊ नये, म्हणून मतदान केल्यानंतर प्रत्येक मतदाराच्या बोटाला शाई लावण्यात आली. मतदान झाल्यानंतर मतमोजणी करण्यात आली आणि त्यानंतर विजयी वर्गप्रतिनिधीचे नाव घोषित करण्यात आले. ही प्रक्रिया पूर्णपणे गुप्त मतदान करून पूर्ण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून उद्याचे सक्षम नागरिक घडणार असल्याचा संदेश सर्वांना दिला. निवडणूक प्रक्रियेसाठी उद्धव कदम यांनी मुलांची तयारी तसेच लोकशाही व निवडणूक ही नाटिका प्रीती पारकर यांनी विद्यार्थ्यांकडून बसवून घेतली. या उपक्रमासाठी रोहिणी गायकवाड, संजना बाईत, प्रियांका फडके यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा समिती अध्यक्ष देवदत्त भिशीकर आणि शाळा समिती डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.