। पनवेल । प्रतिनिधी ।
उन्हाळी सुट्टीनंतर 15 जूनपासून शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजणार असून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात व्हावे, यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सर्व पालिका शाळांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत शाळांच्या वर्गखोल्या, परिसर, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तसेच खेळाच्या मैदानांची साफसफाई करण्यात आली. शाळांमधील आवश्यक दुरुस्तीची कामेही पूर्ण करण्यात आली असून विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आनंदी वातावरणात स्वागत करण्यासाठी शाळा प्रशासन सज्ज झाले असून शाळा परिसर स्वच्छ व आकर्षक करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
पनवेल महापालिकेकडून शाळांमध्ये स्वच्छता मोहीम
