। पेण । प्रतिनिधी ।
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत तंत्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात स्कूल कनेक्ट हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची माहिती, तंत्रशिक्षणातील संधींची उपलब्धता, प्रवेश नियमावली व केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन पेण तसेच रायगड जिल्ह्यातील काही खासगी तंत्रनिकेतने सहभागी झालेली आहेत.
इयत्ता दहावीनंतर अल्प कालावधीचे रोजगाराभिमुख स्वरूपाचे शिक्षण म्हणून पदविका अभियांत्रिकीकडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत माहिती व्हावी याकरीता हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शासकीय तंत्रनिकेतन, पेणचे प्र. प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी या उपक्रमाचे जिल्हा समन्वयन अधिकारी म्हणून काम पाहत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय तंत्रनिकेतन पेण तसेच जिल्ह्यातील विविध खासगी पदविका संस्थांमधील अधिव्याख्यात्यांनी रायगड जिल्ह्यातील विविध टप्प्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. यात प्रवेशाकरीता आवश्यक पात्रता, आवश्यक विविध कागदपत्रे, वेगवेगळ्या शिष्यवृत्ती इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील कोणत्याही माध्यमिक शाळेस इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शनपर मेळावा आयोजित करावयाचा असल्यास संबंधित मुख्याध्यापकांनी तालुका नोडल अधिकारी अमोल यादगिरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. नितीन कुलकर्णी यांनी केले आहे.






