। नवी मुंबई । वार्ताहर ।
कोरोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूमुळे मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थावर टाकला होता. नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी याबाबत अधिकार्यांची बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर शहरातील शाळा या 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या शहरातील प्रसाराची काय परिस्थिती असेल हे पुढील पंधरा दिवसांत समोर येईल. यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचे महापालिकेच्या शिक्षण अधिकार्यांनी सांगितले. ओमायक्रॉनच्या भीतीमुळे प्राथमिकच्या शाळा सुरू करायच्या की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र राज्य शासनाने सोमवारी शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे जाहीर केले. मात्र मुंबई महानगर क्षेत्राबाबत तेथील स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा असे शासनाने सांगितले होते.
महापालिका आयुग्क अभिजीत बांगर यांनी आरोग्य, शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य विभागाबरोबर चर्चा करण्यात आली. ओमायक्रॉन तीव्रता, त्याचा संसर्ग, प्रसार याची महिती घेण्यात आली. त्यामुळे पुढील कालावधीत ओमायक्रॉनची तीव्रता काय राहील याबाबत अधिकची माहिती समोर येईल. त्यामुळे शाळा 1 डिसेंबरपासून सुरू न करता 15 डिसेंबरपासून सुरू होतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.