शालेय कराओके स्पर्धा उत्साहात

| पनवेल | प्रतिनिधी |

लायन्स पनवेल सरगमतर्फे आंतर शालेय कराओके गायन स्पर्धा नुकत्याच बांठिया हायस्कूलच्या सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धा इयत्ता 4थी पर्यंत, इयत्ता 5वी ते 7वी आणि इयत्ता 8वी ते 10वी या 3 गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या आंतर शालेय कराओके स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील 3 वर्षाची सर्वात लहान स्पर्धक रूही राऊत ही या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरली. विजेत्यांना प्रमुख अतिथी नमिता मिश्रा यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच, या स्पर्धेतील विजेत्यांना ‌‘सरगम कराओके लिट्ल स्टार‌’ हे आकर्षक चषक आणि रोख पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम क्रमांक कैवल्य लोंढे, द्वितीय क्रमांक प्रेम पाटील, तृतीय क्रमांक प्रांजल ठाकूर व उत्तेजनार्थ क्रमांक शौर्य सोनावणे यांनी पटकावला. तसेच, दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक रोहित कुमार, द्वितीय क्रमांक मार्वी ठाकूर, तृतीय क्रमांक ओंकार शिंपी व उत्तेजनार्थ क्रमांक युक्ता भोईर यांनी पटाकवला. तर, तिसऱ्या गटात प्रथम क्रमांक स्वर म्हात्रे आणि श्रीमती मेहता यांना विभागून देण्यात आला असून द्वितीय क्रमांक तनिषा चव्हाण, तृतीय क्रमांक रियांक जाधव व उत्तेजनार्थ देवश्री घोडके यांनी यश संपादन केले.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विजय मनोहर आणि सुनील काशीद यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरगम क्लबचे अध्यक्ष प्रेमेंद्र बहिरा यांना संजय गोडसे, अल्केश शहा, स्वाती गोडसे, आदित्य दोशी, ओंकार खेडकर, मानदा पंडित, संध्या महानुभाव, अश्विनी खेडकर तसेच मयुर हाय फायचे मयुर ठक्कर, बांठिया हायस्कूलचे सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version