। अलिबाग । प्रतिनिधी ।
लायन्स क्लबच्यावतीने लायन्स अलिबाग फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीवलमध्ये कराओके अंतिम फेरी पार पडली. यामध्ये जयदास कोलथरकर हे कराओके आयडॉल 2025 चा मानकरी ठरले. त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
गायनाची आवड असणार्या स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी अलिबाग लायन्स क्लबच्यावतीने कराओके स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वेगवेगळ्या फेर्या झाल्या. अंतिम फेरी फेस्टीवलच्या शुभारंभाप्रसंगी घेण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या गायकांनी आपल्या बहारदार आवाजने प्रेक्षकांची मने जिंकली. हिंदी व मराठी तसेच जूनी, नवी गाणी ऐकण्याचा आनंद नागरिकांना मिळाला. या स्पर्धेत एकूण 14हून अधिक स्पर्धेत सहभाग झाले होते. अंतिम फेरीमध्ये जयदास कोलथरकर यांनी प्रथम क्रमांक मिळवून कराओके आयडॉल 2025 चा बहुमान मिळविला. या स्पर्धेत सचिन ठाकूर यांनी द्वितीय, शिवदास नाखवा यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तसेच अजय वारे, धनंजय साकृडकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून यशवंत कुलकर्णी, कस्तुरी देशपांडे, मुशरफ खान यांनी काम पाहिले. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.