| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील नवघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सवात 1लीत दाखल होणार्या विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षकांनी व 8 वीच्या विद्यार्थिनीनी औक्षण करून शाळेत स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल राणे आणि दाखल होणार्या विद्यार्थ्यांचे हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. इयत्ता 1लीत प्रवेशपात्र असलेल्या गावातील एकूण 8 विद्यार्थ्यांचे औक्षण करून सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेतील 7 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांनी फुग्यांनी शाळेची सुंदर सजावट केली, रांगोळी काढली तसेच दाखल पात्र विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट तयार केला. दाखल पात्र विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेतले. नंतर विद्यार्थ्यांच्या पूर्व ज्ञानावर आधारीत शारीरिक, बौद्विक, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्वक तयारी या क्षमतांची चाचणी घेण्यात आली. यासाठी शाळा स्तरावर एकूण सात स्टॉल तयार करण्यात आले होते. या प्रसंगी प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची बडबडगीते व नृत्य, खेळ घेण्यात आले. अत्यंत आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेऊन पुढील दीड महिन्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांची कशी तयारी करून घ्यायची, याबाबत पालकांशी चर्चा करण्यात आली.
या प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक प्रमोद म्हात्रे, संगीता बैकर, वृषाली गुरव, अर्चना ठाकरे, अनुजा माने, अंकिता जाधव, अशोक कुवर, अंगणवाडी कार्यकर्ती निवेदीता चव्हाण आणि शाळेतील 7 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली.