चिमुकल्यांनी घेतला अध्यापनाचा आनंद; आत्मविश्वास, नेतृत्वगुणांना नवी उभारी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, तसेच शिक्षकाची भूमिका, जबाबदारी आणि अध्यापनातील आनंद विद्यार्थ्यांना अनुभवता यावा, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा नवघर येथे आगळावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने इयत्ता सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी चक्क ‘विद्यार्थी शिक्षक’ बनून इयत्ता पहिलीपासून सातवीपर्यंतच्या वर्गांचे अध्यापन केले.
या उपक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी शिक्षकांनी शाळेतील शिक्षकांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. त्यानंतर विद्यार्थी शिक्षकांनी विविध वर्गांमध्ये जाऊन आपल्या आवडीच्या विषयांचे अध्यापन केले. हसत-खेळत शिक्षण, मनोरंजक कृती, खेळ, प्रश्नोत्तर, कविता, संवाद आणि विविध शैक्षणिक पद्धतींचा वापर करत विद्यार्थ्यांनी अध्यापनाचा मनमुराद आनंद घेतला. या उपक्रमात परी, खुशी, आर्या, सामर्थ्य, शुभम, आरोही, दीपाली आणि उर्मी या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिक्षकाची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि सादरीकरण कौशल्य विकसित होत असल्याचे दिसून आले.
यावेळी शुभम ठाकूर याने आपला अनुभव सांगताना, “आज शिक्षक होऊन मुलांना शिकवताना खूप आनंद झाला. शिक्षक म्हणून वर्ग घेणे वेगळेच वाटले. मुलांना समजावून सांगताना शिक्षकांचे काम किती आनंददायी आणि जबाबदारीचे आहे, याचा अनुभव आला,” असे सांगितले. तसेच, परी आणि खुशी यांनी, वर्गात सुंदर कविता सादर करून विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात सहभागी करून घेतले. विद्यार्थ्यांनीही आपल्या मोठ्या दादांना-ताईंना शिक्षकाच्या भूमिकेत पाहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन विषयशिक्षिका वृषाली गुरव व उपशिक्षक राजेंद्र अंबिके यांनी केले. विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व केवळ ऐकून नव्हे, तर प्रत्यक्ष शिक्षकाची भूमिका अनुभवून समजावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयडॉल शिक्षक राजेंद्र अंबिके यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना ‘शिक्षक होण्याचा’ अनुभव देणारा हा उपक्रम नवघर शाळेत आनंददायी, अनुभवाधारित आणि संस्मरणीय ठरला.






