शालेय विद्यार्थाना गणवेश नाही

एक राज्य एक गणवेश योजनेचा भोंगळ कारभार

| तळा | वार्ताहर |

शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला, तरीही तळा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश, बुट, मोजे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर जुने गणवेश घालून शाळेत जाण्याची वेळ आली आहे. काही विद्यार्थ्यांचे गणवेश फाटल्यामळे गणवेशाऐवजी दूसरे कपडे घालून हे विद्यार्थी शाळेत जात आहेत.

राज्य शासनाने जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत हद्दीतील शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजना सुरू केली असून, या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना दोन गणवेश, बुट आणि दोन पायमोजे देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे. तळा तालुक्यात 84 शाळांतील 1600 विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांसोबत एक गणवेश देण्यात येणार होते. पुस्तके तर विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहेत. गणवेश व बुटांचा अद्यापही पत्ताच नाही. परिणामी, त्यांना जुने गणवेश धुतल्यानंतर लवकर वाळत नसल्याने विद्यार्थ्यांना इतर कपडे घालून शाळेत जावे लागत आहे. सरकारने लवकरात लवकर गणवेश, बुट, मोजे देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.

दरवर्षी मोफत गणवेश योजनेत शाळा पातळीवर असणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीला पैसे देवून त्यानूसार गणवेश खरेदी करण्यास सांगण्यात येत होते. मात्र, यंदापासून योजनेच्या अंमलबजावणीत बदल करण्यात आला आहे. या वर्षापासून राज्य पातळीवरून कापड पुरविण्यात येणार असून, हे कापड महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत ते शिवून घेण्यात येणार आहेत. याबाबतचा कार्यारंभ आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आला. परंतु, अद्यापही गणवेश मिळालेले नाहीत. यासंदर्भात पंचायत समिती प्रभारी गटशिक्षण अधिकारी सुरेखा तांबट यांच्याकडे संपर्क साधला असता, त्यांनी गणवेश 15 ऑगस्ट पूर्वी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. गणवेश उपलब्ध होताच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version